Fifteen murders in Beed district in six months
बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा होत असताना बीड पोलिसांच्या कामगिरीची आकडेवारीच समोर आली आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांत पंधरा खून झाले असून सर्व गुन्हे उघड झालेले आहेत. गतवर्षी याच कालावधीत २२ खून झालेले होते. तर दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांत पाच टोळ्यांवर मकोका लावण्यात आला असून एमपीडीएचे बारा प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना s सातत्याने घडत असल्याने पोलिस दलाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये काही अंशी यश येत असल्याचे दिसते. गेल्या सहा महिन्यांतील पोलिसांच्या कारवाईचा लेखाजोखाच समोर आला असून यामध्ये पोलिस दलाची कामगिरी सुधारलेली दिसत आहे. यामध्ये गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. तर अवैध दारूच्या १ हजार २५५ केसेसमध्ये १ कोटी ४७ लाख ८३ हजार २२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच जुगार ३८२, गांजा १४ व गुटख्याच्या ६४ केसेस करण्यात आल्या आहेत.
या सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे गतवर्षी एकाही टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली नव्हती. यावेळी मात्र गेल्या सहा महिन्यांत पाच टोळ्यांतील ३६ आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेले आहे. यापैकी ३ प्रकरणात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.
तसेच एमपीडीए अंतर्गत १३ प्रस्ताव सादर करण्यात आले होते त्यातील बारा प्रस्ताव मंजूर झाले असून एक प्रस्ताव प्रलंबित आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत असून नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा केला जातो. यामध्ये ७ हजार १३ अर्जावर उपाययोजना करण्यात आल्या.
पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांना प्रत्येक महिन्यात गुन्हे आढावा बैठकीदरम्यान नवीन कायदेविषयक कार्यशाळा व विविध प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच एआय टुल्स या आधुनिक प्रणाली वापराबाबत मार्गदर्शन केले जात असल्याने तपास कामात गती येताना दिसत आहे.