Father son Die of Electric Shock in Georai Beed
गेवराई: विद्युत वाहिनीच्या तारेला स्पर्श करून गेवराईतील शेतक-याने आपली जीवन यात्रा संपविली. दरम्यान, तारेला चिकटलेल्या वडिलास ओढून काढताना मुलाचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (दि.२७) सकाळी घडली. अभिमान लक्ष्मण कबले (वय ४५), ज्ञानेश्वर अभिमान कबले (वय २१, रा. मारफळा, ता. गेवराई, जि.बीड) असे मृत बापलेकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभिमान कबले व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर आज सकाळी उसाला रासायनिक खत टाकत होते. यावेळी अभिमान यांनी शेतातील वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श केला. आपल्या वडिलास विजेचा धक्का लागला असावा, असे समजून ज्ञानेश्वर हा वडिलांना बाजुला करण्यासाठी गेला. मात्र, त्याचा देखील विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. बाप-लेकास बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, अभिमान मागील काही दिवसांपासून कर्ज कसे फिटणार, मुलीच्या लग्नाचे काय होणार? या विवंचनेत होते. यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सरपंच तथा नातेवाईक शरद कबले यांनी सांगितले. मारफळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.