Ambajogai News : अंबाजोगाई पोलिसांच्या तपासामुळे तब्बल ८ वर्षांनी झाली बाप लेकांची भेट  file photo
बीड

Ambajogai News : अंबाजोगाई पोलिसांच्या तपासामुळे तब्बल ८ वर्षांनी झाली बाप लेकांची भेट

पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुटुंबात उत्साह, पोलिसांचे मानले आभार

पुढारी वृत्तसेवा

Father and son reunited after 8 years thanks to Ambajogai police investigation

अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा अंबाजोगाई शहर पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या तरुणाची त्याच्या कुटुंबाशी भेट घडवण्यात यश मिळाले आहे.

लातूर जिल्ह्यातील एका कुटुंबासाठी आनंदाची बातमी समोर आली असून, तब्बल आठ वर्षांपासून हरवलेला तरुण पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे शोधण्यात यश आले आहे. सत्यम महादेव हुडगे (वय २१, मुळगाव- लातूर जिल्हा) हा अंबाजोगाई शहर येथे अभियांत्रिकी शिक्षणासाठी राहत होता. मात्र शिक्षणात लक्ष न लागणे व वेळोवेळी नापास होणे यामुळे कुटुंबीयांकडून त्याला समज देण्यात येत होती.

त्याच पार्श्वभूमीवर त्याने आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढून दिनांक ०९ मार्च २०१८ रोजी अंबाजोगाई येथून निघून गेला होता. त्यानंतर त्याने कुटुंबीयांशी सर्व संपर्क तोडला होता. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांकडून सातत्याने शोध घेण्यात येत होता, मात्र तो मिळून येत नव्हता.

दरम्यान सन २०२६ मध्ये पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार या प्रकरणाचा पुन्हा पाठपुरावा करून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बीड येथील टेक्निकल सेलच्या मदतीने संबंधित तरुणाचा मोबाईल क्रमांक शोधून त्याचे लोकेशन निश्चित केले.

पोलिसांनी वडिलांना वेळोवेळी फोनद्वारे संपर्क साधून दिल्ली येथे आवश्यक सर्व माहिती व मार्गदर्शन पुरवले. त्यांच्या अचूक समन्वयामुळे वडिलांना मुलापर्यंत पोहोचणे शक्य झाले. सदर तरुण सध्या दिल्ली- गाझियाबाद येथे भागीदारीत कुरिअर व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याने तेथेच विवाह केल्याची माहितीही समोर आली आहे.

यानंतर वडील दिल्ली- गाझियाबाद येथे पोहोचले असता पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा शोध लागून तब्बल आठ वर्षांनंतर बाप-लेकाची भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले. ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व पोलीस हवालदार पांडुरंग काळे यांनी केला. हरवलेला मुलगा सुखरूप मिळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले असून, या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक बीड, नवनीत कावत यांचे आवाहन

सध्याच्या काळात पालक व विद्यार्थी यांच्यातील संवाद तुटत चालला असून, शिक्षणाचा वाढता दबाव, अपयशाची भीती व मानसिक ताण यामुळे मुलांमध्ये रागीटपणा वाढत आहे. अशा परिस्थितीत मुलगा असो अथवा मुलगी, घर सोडून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद वाढवणे व संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे.

SCROLL FOR NEXT