Farmer experiment : पावसासाठी शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग file photo
बीड

Farmer experiment : पावसासाठी शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

झाडांची पाने-फांद्या जाळून केला धूर; पिके वाचवण्यासाठी धडपड

पुढारी वृत्तसेवा

Farmers' unique experiment to bring rain

धारूर, पुढारी वृत्तसेवा धारूर तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या धारूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पाऊस पडावा यासाठी अनोखा प्रयोग केला.

धारुर परिसरातील शेतकऱ्यांनी विविध वनस्पती व झाडांची पाने, फांद्या आणि इतर साहित्य एकत्र करून त्याची होळी केली. त्यातून निघणारा धूर वातावरणात जावा आणि पाऊस पडावा, या श्रद्धेतून हा प्रयोग करण्यात आला. पाऊस पडेल आणि पिकांना जीवदान मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी हा उपक्रम केला.

पावसाअभावी सोयाबीनसह खरीप हंगामातील विविध पिके संकटात आली आहेत. पेरणी, बियाणे, खते, औषधफवारणी यासाठी मोठा खर्च करूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून आता केवळ पावसाची आस लागली आहे.

या पारंपरिक प्रयोगातून पाऊस पडेलच, याची वैज्ञानिक खात्री नसली तरी पावसाची प्रतीक्षा आणि संकटाच्या काळात शेतकऱ्यांची मनधरणी करण्याची भावना या माध्यमातून दिसून आली. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या वेळी सुधीर उमाप, धनराज धोतरे, अशोक धोतरे, संभाजी धोतरे, लक्ष्मण धोतरे, संदीप खिलोजी, अनिल माळेकर, अनिल धोतरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान धारूर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. यापुर्वी झालेला पाऊस देखील पिकांपुरताच झालेला असल्याने आता जमिनीतील ओल पुर्णपणे कमी झाली आहे अशा स्थितीमध्ये पाऊस न झाल्यास कपाशी, सोयाबीन, तुर, उडीद ही पिके वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांना असल्याने असे प्रयोग केले जात आहेत-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT