बोगस ज्वारी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक file photo
बीड

बोगस ज्वारी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

उंची दीड फुटांवरच खुंटली; धान्य नाही, कडबाही नाही-दुहेरी फटका

पुढारी वृत्तसेवा

Farmers cheated due to bogus sorghum seeds

राजू म्हस्के

कडा :

आष्टी तालुक्यात कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेल्या ज्वारी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनावर विश्वास ठेवून घेतलेल्या बियाण्यांपासून अपेक्षित उत्पादन न मिळता ज्वारीची वाढ केवळ दीड फुटांवरच खुंटल्याचे चित्र दौलावडगावसह तालुक्यातील अनेक गावांत दिसत असून, शेतकऱ्यांच्या हातात अक्षरशः बाटूक आले आहे.

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने ही बियाणे पेरली होती. मात्र पिकांची वाढ खुंटली, कणसे भरली नाहीत आणि कडबा तयार होण्याअ-ाधीच पिके निष्प्रभ ठरली. परिणामी धान्य उत्पादन पूर्णतः कोलमडले असून पशुखाद्यासाठी आवश्यक असलेला कडबाही हाती आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. या नुकसानीमुळे केवळ धान्य उत्पादनच नाही, तर जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेक शेतकऱ्यांना बाहेरून महागड्या दराने चारा खरेदी करावा लागत असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा ताण अधिकच वाढला आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कृषी विभागाने वितरित केलेली बियाणे निकृष्ट किंवा बोगस असून त्यांची योग्य तपासणी न करता वितरण करण्यात आले. त्यामुळे बियाणे, मशागत, मजुरी, खते व इतर सर्व खर्च वाया गेला आहे. याआधी सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला असताना, आता रब्बी हंगामही अपयशी ठरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान या विषयावर कृषी अधिकारीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे.

यासंबंधी कृषी विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कृषी विभागाने दिलेल्या बियाण्यांवर विश्वास ठेवून आम्ही पेरणी केली; पण पिकाची वाढच झाली नाही. ना धान्य मिळाले, ना कडबा. आमचा सर्व खर्च वाया गेला असून आम्ही पूर्णपणे उद्धस्त झालो आहोत. या प्रकाराची सखोल चौकशी करून आम्हाला नुकसानभरपाई द्यावी व दोषींवर कारवाई करावी असे शेख कासम कय्युम यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा संताप व्यक्त

या संपूर्ण प्रकरणामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, तसेच दोषी बियाणे पुरवठादार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT