गेवराई : शेतातून घरी येत असताना बीडच्या गेवराईतील शेतकरी नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली असून, सदरील शेतक-याचा मृतदेह तब्बल पंधरा तासानंतर आढळून आला. ज्ञानेश्वर सखाराम पराडे (वय ३७, रा.टाकळगव्हाण, ता. गेवराई जि. बीड) असे मृत शेतक-याचे नाव आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातसह बीड जिल्ह्याला देखील मंगळवारी अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून अतिमुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
यातच काल शेतातून घरी येताना बीडच्या गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथील शेतकरी ज्ञानेश्वर सखाराम पराडे हे पुल ओलांडून जात होते. यावेळी पुलावरती आलेल्या पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले. रात्रभर गावकऱ्यांनी त्यांच्या शोध घेतला पण रात्रभर त्याचा शोध लागला नाही.
आज सकाळी शोधकार्य सुरू करताच ज्ञानेश्वर यांचा मृतदेह सात वाजताच्या सुमारास आढळून आला. पुढील पोलीस कार्यवाही नंतर मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे. शेतकरी ज्ञानेश्वर पराडे यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी,दोन मुले एक भाऊ असा परिवार असून, या घटनेमुळे टाकळगव्हाण गावात हळहळ व्यक्त होत आहे.