Farmer breaks down in tears while showing soybeans
वडवणी, पुढारी वृत्तसेवाः पावसाने पाठ फिरवल्याने वडवणी तालुक्यातील खरीप हंगामातील पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभे पीक उद्ध्वस्त होत आहे. मोरवड-पुसरा परिसरातील दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे शेताच्या बांधावर पोहोचल्या. यावेळी करपलेली सोयाबीनची पिके दाखवत एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना कंठ दाटून आला आणि त्याला अश्रू अनावर झाले. दुष्काळाची दाहकता अधोरेखित करणाऱ्या या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मोरवड व पुसरा परिसरातील अवधूत आत्माराम झोडगे यांच्या गट क्रमांक १९१ मधील सोयाबीन पिकाची पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. पावसाअभावी सोयाबीनची झालेली अवस्था, पिकासाठी झालेला खर्च आणि हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेल्याची शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडली.
मोठ्या आशेने पेरणी केली, त्यासाठी कर्ज काढून व पैसा खर्च केला; मात्र पावसाने साथ न दिल्याने संपूर्ण पीक करपून गेले. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह, शेतीचा पुढील खर्च आणि आगामी हंगाम कसा उभा करायचा, या चिंतेने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
चारा व पाण्याची उपलब्धता तसेच पशुधनाच्या आरोग्याबाबत प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणीवेळी माजी आमदार केशवराव आंधळे, तहसीलदार वैभव महिंद्रकर, सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, गटविकास अधिकारी अशोक बाराखोते, कृषी अधिकारी खेडकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, माजलगाव मतदारसंघाचे नेते माधव निर्मळ,
माजी सभापती दिनकरराव आंधळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे, भाजपा जिल्हा सचिव मच्छिंद्र झाटे, अमोल आंधळे, सुखदेव रेडे, ज्योत्स्ना बादाडे, ईश्वर तांबडे, अमरसिंह मस्के, धनराज मुंडे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, भाजपा पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.