अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी आज रविवारी (दि ११) सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. यावेळी अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह वादळी पाऊस झाला आहे.
या वादळी वाऱ्याच्या पावसात सायगाव येथील शेतमजूर दिगंबर शंकर गायकवाड (वय ५९) लिंबाच्या झाडाच्या आश्रयाला आला असताना त्याच झाडावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. तर सुगाव येथील शेतकरी सत्तार अंबीरखाँ पटेल यांच्या शेतात देखील झाडावर विज कोसळून म्हैस दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुभती म्हैस दगवल्याने यात शेतकऱ्याचे अंदाजे ८o हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
सुगावच्या शेतकऱ्याची म्हैस तर सायगाव शिवारात शेतमजुराचा बळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान तहसीलदार विलास तरंगे यांच्या आदेशानुसार विज पडून ठार झालेल्या शेतमजुर व म्हशींचा येथील तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. व पुढील कार्यवाही तसेच शासकीय आर्थिक मदतीसाठी तहसीलदार यांना पंचनामा सादर केला आहे. गावकऱ्यांनी देखील यावर तात्काळ कारवाईचे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.