Excessive mobile phone use is causing communication to be lost
अतुल शिनगारे
धारुर : एकाच घरात चार माणसे राहतात, एकाच छताखाली जेवतात; मात्र प्रत्येकाचे जग आता वेगळे झाले आहे. घरात आई-वडील, मुले आणि ज्येष्ठ नागरिक असतानाही एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेळ उरलेला नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल, डोळे स्क्रीनवर आणि मन आभासी जगात गुंतलेले, असे चित्र अनेक कुटुंबांत दिसून येत आहे. सोशल मीडियावरील संवाद वाढत असताना प्रत्यक्ष कौटुंबिक संवाद मात्र कमी होत असल्याने भावनिक नात्यांमध्येही अंतर निर्माण होत आहे.
मोबाईल हा आजच्या काळातील अत्यावश्यक संवादाचे साधन आणि माहितीचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे. ऑनलाइन शिक्षण, डिजिटल व्यवहार, कामकाज आणि मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला असला, तरी त्याचा अतिरेक आता सामाजिक चिंतेचा विषय ठरत आहे. घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने एकत्र कुटुंबात राहूनही सदस्यांमधील भावनिक संवाद कमी होत आहे.
पूर्वी घरातील सदस्य दिवसातील अनुभव, अडचणी, आनंदाच्या गोष्टी आणि भविष्यातील नियोजन यावर एकत्र बसून चर्चा करीत. आता मात्र जेवणाच्या ताटासमोरही मोबाईलची स्क्रीन सुरू असते. घरातील एखादी व्यक्ती काही सांगत असताना दुसऱ्याचे लक्ष मोबाईलमध्ये असते. मुलांना पालकांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ मिळत नाही, तर पालकही कामाच्या व्यापासोबत मोबाईलमध्ये गुंतल्याने मुलांच्या भावविश्वाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी, एकाच घरात राहूनही कुटुंबातील सदस्यांमध्ये संवादाचा अभाव निर्माण होत आहे.
डिजिटल इंडिया, ऑनलाइन शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे नागरिकांचे जीवन अनेक बाबतीत सुलभ झाले आहे. मात्र डिजिटल सुविधांसोबत त्यांचा जबाबदार आणि संतुलित वापर कसा करावा, याबाबत जनजागृती करणेही तितकेच आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षितता तसेच मोबाईलच्या संतुलित वापराबाबत सातत्याने प्रबोधन होणे गरजेचे आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांकडेही लोकप्रतिनिधींनी गांभीर्यान पाहण्याची गरज आहे. विकासकामे आणि पायाभूत सुविधांसोबत बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्नही सार्वजनिक चर्चेचा विषय झाले पाहिजेत. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुटुंब आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
संस्कारांसाठी वेळ कोण देणार?
लहान वयातच मुलांचा स्क्रीनकडे वाढणारा कल, मैदानी खेळांपासून दूर जाणे आणि प्रत्यक्ष संवाद कमी होणे ही बाब पालकांसाठी चिंतेची ठरत आहे. मुलांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला देताना पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापराचेही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कारण मुलांसाठी पालकांचे वर्तन हेच सर्वात मोठे उदाहरण असते. मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करणे हा त्यावरील उपाय नाही.
त्याऐवजी वापराची मर्यादा निश्चित करणे आणि त्याचा योग्य कारणांसाठी वापर करणे आवश्यक आहे. कुटुंबाने दररोज काही वेळ 'मोबाईलमुक्त' ठेवून एकमेकांशी संवाद साधणे, मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देणे, एकत्र जेवणाची सवय लावणे आणि घरातील ज्येष्ठांना वेळ देणे या छोट्या उपायांतून कौटुंबिक नाती अधिक घट्ट करता येऊ शकतात.