

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ तालुक्यातील नंदनज, कासारवाडी, मिरवट, सारडगाव, मांडवा आणि मरळवाडी या परिसरासाठी महत्त्वाच्या असलेल्या बोरना मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशाविरोधात कारवाई सुरू केली आहे. प्रकल्पात सध्या केवळ १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा असताना अनधिकृतपणे पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संयुक्त पथकाने प्रकल्प परिसरातील अनधिकृत पाणी उपशाची साधने बंद केली. यावेळी मोटारी व पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असून संबंधित डीपी बंद करून खाली काढण्यात आले.
बोरना प्रकल्प हा तालुक्यातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशावर लक्ष केंद्रित केले आहे. वाण प्रकल्पाप्रमाणेच बोरना प्रकल्प परिसरातही नियमित पाहणी करून नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
फौजदारी कारवाईचा इशारा
बोरना प्रकल्पासह परळी तालुक्यातील कोणत्याही जलस्रोतामधून अनधिकृत पाणी उपसा होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित मोटारी, पंप तसेच वीज जोडण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाहणी करून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार विनोद रनवरे यांनी दिला.