Even during heavy rains, banana plantations generated income of Rs. 27 lakhs
अतुल शिनगारे धारूर, पुढारी वृत्तसेवा
धारूर तालुक्यातील अरणवाडी या छोट्याशा खेड्यातील प्रगतशील शेतकरी दादासाहेब श्रीपती फुटाणे यांनी मेहनत, चिकाटी आणि आधुनिक शेतीचा संगम घडवून एक नवा इतिहास रचला आहे. अतिवृष्टीच्या झंझावातात जिथे अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तिथे फुटाणे यांनी शास्त्रीय तंत्रज्ञान, काटेकोर नियोजन आणि अविरत परिश्रमाच्या जोरावर केळी शेतीतून तब्बल २७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
२४ ऑक्टोबर २०२४ रोजी दादासाहेब फुटाणे यांनी आपल्या चार एकर शेतीत पाटील बायोटेक, जळगाव (ऋ-९) या कंपनीच्या ५,५०० केळी रोपांची लागवड केली. प्रत्येकी रोप १८ रुपयांना विकत घेतले गेले. लागवड ते उत्पादन या संपूर्ण कालावधीत त्यांनी मजुरी, औषधे, खतं आणि सिंचन यावर जवळपास पाच लाख रुपये खर्च केला.
पण शेती म्हणजे जुगार नव्हे, तर विज्ञान आहे हे ब्रीद जोपासत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष दिले. योग्य पाणी व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर आणि नियमित निरीक्षणामुळे पिक तग धरत राहिले. या हंगामात झालेल्या अतिवृष्टीने धारूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिक उध्वस्त झाले. मात्र फुटाणे यांनी योग्य जलनिस्सारण यंत्रणा आणि वेळेवर उपाययोजना करून केळीची बाग वाचवण्यात यश मिळवले.
हवामानाच्या प्रतिकूलतेवर मात करत त्यांनी पिकाला योग्य पोषण दिले आणि उत्पादनाचे स्वप्न साकारले. संपूर्ण खर्च वजा घेतल्यावर फुटाणे यांनी केवळ चार एकर शेतीतून अंदाजे २७लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. या यशाने अरणवाडी परिसरात केवळ कौतुकाचीच नव्हे तर प्रेरणेची लाट निर्माण झाली आहे. अरणवाडी परिसरातील अनेक तरुण आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली केळी शेतीकडे वळत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात रोजगारनिर्मिती वाढली असून, ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.
पीक तयार झाल्यानंतर टेंभुर्णी येथील अभिजीत बंदे यांनी फुटाणे यांच्या शेतातूनच संपूर्ण केळीचा माल खरेदी करून इराक आणि इराण या देशांमध्ये निर्यात केली. या केळीला प्रति किलो १७ ते २३ रुपये दर मिळाला. चार एकरांमधून तब्बल १५० टन माल तयार झाला आणि दादासाहेब फुटाणे यांची मेहनत रंग लायी ..!
शेती म्हणजे फक्त जमिनीत पिक घेणे एवढेच नव्हे, तर नियोजन, मेहनत आणि बाजारपेठेची योग्य समज असणे गरजेचे आहे. अतिवृष्टीसारख्या संकटावर मात करून उत्पादन वाढवणे हेच आधुनिक शेतीचे यश मानतो असे दादासाहेब फुटाणे यांनी सांगितले.