हॉटेल व्यावसायिकांसाठी ‌‘एंड यूज सर्टिफिकेट‌’ सक्तीचे pudhari photo
बीड

Hotel business new rule : हॉटेल व्यावसायिकांसाठी ‌‘एंड यूज सर्टिफिकेट‌’ सक्तीचे

गॅस पुरवठ्यासाठी नवा नियम लागू; एलपीजी वितरणात येणार पारदर्शकता

पुढारी वृत्तसेवा

कडा : व्यावसायिक एलपीजी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ‌‘एंड यूज सर्टिफिकेट‌’ सादर करणे अनिवार्य केले असून, या नव्या नियमामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग तसेच विविध संस्थात्मक वापरकर्त्यांना गॅस पुरवठ्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. स्थानिक पातळीवर राहुल गॅस एजन्सीकडून याबाबत ग्राहकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या नियमानुसार, व्यावसायिक ग्राहकांनी गॅसचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी केला जात आहे, याची सविस्तर माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. ‌‘एंड यूज सर्टिफिकेट‌’मध्ये आस्थापनाचे नाव, पत्ता, संपर्क तपशील, जीएसटी किंवा पॅन क्रमांक, ग्राहक आयडी तसेच वितरकाची माहिती नमूद करावी लागणार आहे. याशिवाय, वर्षभरातील अपेक्षित गॅस वापर आणि प्रत्यक्ष वापराचा तपशीलही देणे आवश्यक आहे.

गॅसचा गैरवापर, साठा तफावत आणि सिलिंडर इतरत्र वळवण्याच्या घटना रोखण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. देशभरात एलपीजी वितरणात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हा नियम महत्त्वाचा मानला जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांवर गॅस पुरवठा बंद करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित सर्वांनी वेळेत आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

गॅसचा सुरक्षित आणि योग्य वापर करण्यासाठी तसेच कोणतेही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.अडचणी असल्यास एजन्सीशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळेत ‌‘एंड यूज सर्टिफिकेट‌’ सादर करण्याचे आवाहन

राहुल गॅस एजन्सीचे प्रतिनिधी राहुल जाधव यांनी सर्व हॉटेल व व्यावसायिक ग्राहकांना ‌‘एंड यूज सर्टिफिकेट‌’ वेळेत सादर करण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून गॅस वापराची अचूक व पारदर्शक माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT