Beed News : म्यानमारमध्ये अडकलेल्या तरुणाला सोडवण्यासाठी प्रयत्न file photo
बीड

Beed News : म्यानमारमध्ये अडकलेल्या तरुणाला सोडवण्यासाठी प्रयत्न

अधिक पगाराचे आमिष पडले महागात; परराष्ट्र मंत्रालयासह तपास यंत्रणांची मदत

पुढारी वृत्तसेवा

Efforts to rescue young man trapped in Myanmar

बीड, पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील एका युवकाने फेसबुकवर आलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवून परदेशातील नोकरी स्वीकारण्याचे ठरवले होते. त्यानुसार तो थायलंडला गेला आणि आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्यांच्या तावडीत अडकला. आता या प्रकरणात बीड पोलिस, परराष्ट्र मंत्रालय, एनआयए, आयबी यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. या तरुणाला सुरक्षितरीत्या भारतात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिली.

केज तालुक्यातील एका तरुणाला फेसबुकवर सत्तर हजार रुपयांहून अधिकचा पगार देणारी परदेशातील नोकरीविषयी माहिती देणारी जाहिरात दिसली. त्यावर त्याने संपर्क साधला असता महाराष्ट्रातीलच एका मध्यस्थ व्यक्तीने त्याला थायलंडमध्ये बोलावून घेतले. त्यानुसार 4 जून रोजी तो पुण्याहून थायलंडला पोहचला. त्या ठिकाणाहून त्याला थायलंड आणि म्यानमार सीमेवर नेण्यात आले. तेथे सायबर फसवणुकीशी संबंधित काम त्याच्याकडून घेतले जात होते. या सर्व प्रकारामुळे हा तरुण घाबरला आणि त्याने कुटुंबीयांना माहिती दिली.

त्यानुसार कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार करताच बीड पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली. यानंतर एनआयए, आयबी व इतर तपास यंत्रणांनी देखील माहिती घेतल्यानंतर या तरुणाचे लोकेशन समोर आले आहे. आता म्यानमार सरकारच्या मदतीने त्या तरुणाबरोबरच इतर सातशे तरुणांची देखील त्या ठिकाणाहून सुटका होऊ शकणार असून तसे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिली.

२०२२ मध्ये दोन हजारांहून अधिकांची सुटका

म्यानमार आणि थायलंड सीमेवरील या भागात असे गैरप्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. यापूर्वी 2022 मध्ये दोन हजारांहून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली होती. तेव्हापासून या भागात नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु काहीजण याबाबत माहिती न घेताच अशा ठिकाणी जात असल्याने अशा समस्या निर्माण होत आहेत.

परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी माहिती घ्या: कांवत

परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळतेय म्हणून कोणताही विचार न करता त्या ठिकाणी जाणे धोक्याचे होऊ शकते. अशी काही संधी निर्माण झाल्यास त्या कंपनीची वेबसाईट, यापूर्वीचा इतिहास, बोर्ड ऑफ डायरेक्टर यासह इतर बाबी तपासायला हव्यात. याबरोबरच पोलिसांशी देखील तुम्ही संपर्क साधून याबाबत माहिती मिळवू शकता. अशी खातरजमा केल्यानंतरच परदेशात नोकरीकरिता जाणे सुरक्षित ठरू शकते, अशी माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT