Man Injured In Kaij Taluka
केज : गावातील राजकारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला चापट-बुक्क्यांसह लाकडाने मारहाण करण्यात आल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० जूनरोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हेमंत श्रीपती घोडके हे गावालगतच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसले होते. त्यावेळी गावातील तुकाराम दादाराव गालफाडे तेथे आले. दोघांमध्ये गावातील राजकारणासंदर्भात चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला.
चर्चेदरम्यान तुकाराम गालफाडे यांना राग अनावर झाल्याने त्यांनी हेमंत घोडके यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू नये, असे हेमंत यांनी सांगितल्याने संतप्त झालेल्या तुकाराम यांनी त्यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जवळील लाकडाने त्यांच्या हातावर व पायावर वार केले. या मारहाणीत हेमंत घोडके यांच्या पायाच्या नडगीला व हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे.
या प्रकरणी हेमंत घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम दादाराव गालफाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर करीत आहेत.