केज: बंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीसाठी १० लाख रुपयांची कार माहेरून आणली नाही म्हणून उच्चशिक्षित विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात लाखो रुपयांचा हुंडा आणि १२ तोळे सोने देऊनही 'तू आवडत नाहीस' असे म्हणत पतीने मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पती, सासू-सासऱ्यांसह पाच जणांविरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील उंदरी येथील अपर्णा (नाव बदललेले) या बंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे लग्न लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील रामकृष्ण निपाणीकर याच्याशी 22 डिसेंबर 2024 रोजी झाले होते. रामकृष्ण हा देखील बंगळूरमध्येच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. लग्नावेळी अपर्णाच्या कुटुंबीयांनी मुलाला 8 लाख 65 हजार रुपये हुंडा, 12 तोळे सोन्याचे दागिने आणि वरपक्षाच्या कपड्यांसाठी 75 हजार रुपये रोख दिले होते.
लग्नानंतर काही दिवसांतच पती रामकृष्ण बंगळूरला नोकरीवर परतला आणि त्याने अपर्णासोबत बोलणे टाळण्यास सुरुवात केली. २६ जानेवारी २०२५ रोजी सासरच्या मंडळींनी अपर्णाला बंगळूर येथील तिच्या पतीच्या घरी सोडून दिले. तिथे एके दिवशी पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलीसोबतचे आक्षेपार्ह संभाषण, फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याने अपर्णाला मोठा धक्का बसला.
याविषयी पतीला जाब विचारला असता, "मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, तू आवडत नाहीस, फक्त नातेवाईकांच्या दबावामुळे लग्न केले," असे म्हणत त्याने तिला मारहाण केली. हा प्रकार तिने सासू-सासरे आणि नणंदेला सांगितला असता, त्यांनी तिलाच दोष देत शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला उपाशी ठेवण्यात आले आणि पतीच्या प्रेमसंबंधांबद्दल कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर, सासरच्यांनी तिच्याकडे चक्क १० लाख रुपयांच्या कारची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्याने तिला बंगळूर येथील घरातून हाकलून देण्यात आले.
या छळाला कंटाळून अखेर अपर्णा यांनी २० जुलै रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी:
पती: रामकृष्ण अनिल निपाणीकर, सासरे: अनिल कोंडीबा निपाणीकर, सासू: सरिता अनिल निपाणीकर (सर्व रा. मुरुड, जि. लातूर), नणंद व नंदावा (रा. भाटसांगवी, ता. चाकूर)
या पाच जणांविरुद्ध गुन्हा रजि. नं. १८६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि ८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपीनाथ डाके करत आहेत.