Dussehra gathering today at Bhagwan Bhaktigarh, Narayan Gad; Millions of people will attend
बीड, पुढारी वृत्तसेवा शिरुर तालुक्यातील नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत तर भगवान भक्तिगड येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. या दोन्ही मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात के आला आहे.
नारायणगड येथे दसरा मेळाव्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. मनोज जरांगे हे गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी उपस्थित राहत येणाऱ्या भावीकांना मार्गदर्शन करतात. जरांगे हे सकाळी निवासस्थानावरुन निघणार असून दुपारी १२ वाजेपर्यंत नारायणगड येथे पोहचतील. व दर्शन घेवून व्यासपीठावर येतील. गडावर येणाऱ्या लोकांची संख्या पाहता पाणी तसेच नाष्ट्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच गडाच्या चारही बाजुंनी पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
भगवान भक्तीगड येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. गेल्या अकरा वर्षांपासून हा मेळावा सावरगाव घाट या भगवानबाबांच्या जन्मभूमीत होत असून यंदाचे हे बारावे वर्ष आहे. मंत्री पंकजा मुंडे या परळी येथून सकाळी 11 वाजता हेलीकॉप्टरने निघणार असून त्या दुपारी साडेअकरा वाजता भगवान भक्तीगडावर पोहचतील. त्या ठिकाणी संत भगवानबाबांची आरती झाल्यानंतर त्या व्यासपीठावर दाखल होतील. या मेळाव्यासाठी माजी खा. सुजय विखे पाटील, माजी खा. प्रितम मुंडे व आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दोन्ही गडावर तगडा पोलिस बंदोबस्त
भगवान भक्तिगड व नारायणगड येथे लाखोंच्या संख्येने लोक येणार आहेत. यामुळे तेवढाच तगडा बंदोबस्त पोलिस दलाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. यामध्ये अतिरिक्त पोलिस अधिक्षक, दोन डीवायएसपी, 275 पोलिस कर्मचारी, 2 आरसीपी प्लाटून व एक एसआरपी प्लाटून अशा पद्धतीने सारखाच बंदोबस्त दोन्ही गडावर राहणार आहे. याबरोबरच दोन्ही ठिकाणी तीस अधिकारी देखील सर्व बंदोबस्तावर नजर ठेवणार आहेत.