Drought conditions intensify; Water reserves below 10 percent
परळी वैजनाथ : दुष्काळाची तीव्रता वाढत असताना परळी वैजनाथ तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक बनली आहे. तालुक्यातील अनेक तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली घसरला असून, सर्वांत गंभीर स्थिती दैठणा सा. तलावाची आहे. या तलावात अवधा ६.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, परळी शहरासह तालुक्यातील १५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पातही केवळ १९.७२ टक्के पाणी शिल्लक असल्याने आगामी काळातील पाणीप्रश्नाची चिंता वाढली आहे.
तालुक्यातील आठ प्रमुख जलसाठ्यांच्या सद्यस्थितीवर नजर टाकली असता, वाण मध्यम प्रकल्पात १९.७२ टक्के, बोरणा मध्यम प्रकल्पात १७ टक्के आणि कन्हेरवाडी प्रत्येक थेंबाचे नियोजन आवश्यक लघुपाटबंधारे तलावात १४.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दौंडवाडी सा. तलावात ११.२९ टक्के पाणी शिल्लक आहे.
यानंतर परिस्थिती अधिक गंभीर होत जाते. गोपाळपूर ल.पा. तलावात ९ टक्के, मालेवाडी ल.पा. तलावात ८.४३ टक्के, चांदापूर ल.पा. तलावात ८.२४ टक्के, तर दैठणा सा. तलावात केवळ ६.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. परळी शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या वाण प्रकल्पाची एकूण क्षमता १२.७१ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पात सुमारे १९ टक्के पाणी शिल्लक असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक कठीण बनले आहे. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्यास उपलब्ध साठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. परळी शहरासाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था आतापासूनच उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील जलसाठे झपाट्याने आटत असताना परळीच्या जवळपास अन्य ठोस जलस्रोत उपलब्ध नसल्याने परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील खडका बंधा-यातून पाणी उपसा करण्याच्या पर्यायाला परवानगी मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे खडका बंधाऱ्यापासून परळी येथील वीजनिर्मिती केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी यापूर्वीच पाइपलाइनची व्यवस्था आहे.
२०१५ मधील दुष्काळाच्या काळात नागापूरच्या वाण धरणातून वीजनिर्मिती केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे धरणापासून वीजनिर्मिती केंद्रातील पाणी साठवण हौदापर्यंत पाइपलाइन उपलब्ध आहे. ही व्यवस्था पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेशी जोडता आल्यास परळी शहराला पर्यायी पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तातडीने तपासणी करण्याची गरज आहे. जलगाव पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सहा मध्यम प्रकल्प असून, त्यापैकी तीन प्रकल्प परळी तालुक्यात आहेत. नागापूर येथील वाण, बोधेगाव येथील मध्यम प्रकल्प आणि बोरणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही कमी होत आहे.
माजलगाव पाटबंधारे प्रकल्पांतर्गत जवळपास सर्वच प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांच्या आत साठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे कार्यकारी अभियंता जी. आर. आदमानकर यांनी सांगितले.
प्रत्येक थेंबाचे नियोजन आवश्यक
नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे. दुष्काळाचे संकट दारात असताना पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. नळांना तोट्धा लावणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि कुठेही गळती आढळल्यास प्रशासनाला तातडीने माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाणीपुरवठा सभापती जयश्री रविंद्र गित्ते यांनीही नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
वाण प्रकल्पात मर्यादित साठा असल्याने पाण्याचा अपव्यय टाळावा, नळांना तोट्या बसवाव्यात तसेच पाणीगळती किंवा तांत्रिक अडचण आढळल्यास नगर परिषदेला तत्काळ कळवावे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरातील नवीन बांधकामांनाही मर्यादा घालण्याची गरज असल्याचे बांधकाम सभापती पवन मुंडे यांनी म्हटले आहे. आगामी काळात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास पाणीटंचाई आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आता प्रशासनाची कसोटी
तालुक्यातील आठ जलसाठ्यांपैकी तीन जलसाठे १० टक्क्यांच्या खाली, तर सहा जलसाठे १५ टक्क्यांच्या आत आले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन, पर्यायी स्रोतांची चाचपणी आणि गळती रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाण्याचा साठा संपल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आत्ताच पर्यायी व्यवस्था उभी करणे, हीच प्रशासनासमोरील खरी गरज आहे.