Beed Georai Marigold Market Price Pudhari
बीड

Marigold Flower Prices Drop | दुष्काळाने झेंडूचे उत्पादन घटले: प्लास्टिकच्या फुलांमुळे मागणीही कमी, गेवराईत गाठडीला अवघे ५० रुपये

सणासुदीच्या काळात झेंडूला चांगला भाव मिळेल, या आशेने लागवड करणाऱ्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे यंदा आर्थिक गणित कोलमडले

पुढारी वृत्तसेवा

Beed Georai Marigold Market Price

गजानन चौकाटे

गेवराई : दसऱ्याच्या सणात घराघरांत झेंडूच्या फुलांची तोरणे सजली, देवांच्या चरणी फुले वाहिली गेली; मात्र हीच फुले पिकविणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला निराशा आली. सणासुदीच्या काळात झेंडूला चांगला भाव मिळेल, या आशेने लागवड करणाऱ्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे यंदा आर्थिक गणित कोलमडले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने उत्पादनात घट झाली, तर प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणीही कमी होत असल्याने बाजारात झेंडूला सकाळपासूनच गाठडीमागे अवघे ५० रुपये मिळत आहेत. त्यामुळे मेहनत, खर्च आणि अपेक्षा असूनही शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही उरत नसल्याचे चित्र आहे.

नवरात्र आणि दसरा हा झेंडू उत्पादकांसाठी उत्पन्नाची महत्त्वाची संधी असते. याच हंगामावर लक्ष ठेवून अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करून फुलबाग फुलविली जाते. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरविल्याने पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. उपलब्ध पाण्यावर झाडे जगविण्याची धडपड करूनही अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. सणासुदीच्या दिवसांत चांगला भाव मिळेल, अशी आशा होती; परंतु कमी उत्पादन आणि बाजारातील कमी दरामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

कोल्हेर येथील शेतकरी प्रमोद माळतकर यांच्याकडे झेंडूची जवळपास चार हजार रोपे होती. या लागवडीतून साधारण दीड टन फुलांचे उत्पादन अपेक्षित होते; मात्र यंदा अवघे अडीच क्विंटल उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनात मोठी घट झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या माळतकर यांना बाजारभावाचाही फटका बसला. गेवराई बाजारपेठेत सकाळीच एका गाठडीला ५० रुपये भाव मिळत असल्याने खर्च वसूल करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासह इतर झेंडू उत्पादकांसमोर उभा आहे.

“चार पैसे मिळतील म्हणून झेंडूची लागवड केली. चार हजार रोपांची काळजी घेतली, खर्च केला; पण अपेक्षित उत्पादनच मिळाले नाही. साधारण दीड टन फुले निघण्याची अपेक्षा होती, मात्र अडीच क्विंटलच माल झाला. त्यात गाठडीला अवघे ५० रुपये मिळत आहेत. एवढे कष्ट करूनही हातात काही उरत नसेल, तर शेती करायची कशी?” अशी व्यथा शेतकरी प्रमोद माळतकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांमुळेही झेंडूच्या फुलांची मागणी कमी होत असल्याचे शेतकरी कल्याण येवले यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात घरांची सजावट आणि तोरणांसाठी कृत्रिम फुलांचा वापर वाढत असल्याने नैसर्गिक फुलांना अपेक्षित मागणी मिळत नाही. त्यामुळे झेंडू उत्पादकांना बाजारात योग्य भाव मिळविणे कठीण होत आहे. पावसाअभावी घटलेले उत्पादन आणि दुसरीकडे कमी झालेली मागणी, अशा दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.

एकीकडे पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली, तर दुसरीकडे झेंडूला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सणासाठी फुले खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हातात झेंडूची गाठडी जात असली, तरी त्या प्रत्येक गाठडीमागे शेतकऱ्याचा खर्च, कष्ट आणि अपेक्षा दडलेल्या आहेत. झेंडू उत्पादकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT