Anandacha Shidha pudhari photo
बीड

Laborers appeal for Anandacha Shidha in drought | 'दुष्काळात तरी आनंदाचा शिधा द्या', मजुरांची आर्त हाक

चाकूर : दुष्काळात तरी आनंदाचा शिधा द्या, मजुरांची आर्त हाक

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे शेतमजूर आणि बांधकाम मजुरांच्या हाताला पुरेसे काम मिळत नाही. चारा-पाण्याची टंचाई, वाढती महागाई आणि खालावलेली आर्थिक परिस्थिती यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सरकार माय बाप, बारा भानगडी सोडून गरिबांच्या ताटाची चिंता करून दिवाळीच्या तोंडावर गरीब कुटुंबांना आधार ठरणाऱ्या 'आनंदाचा शिधा' द्या, अशी आर्त हाक मजूर कुटुंबाकडून होताना दिसत आहे.

महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू केलेल्या या योजनेतून लाभार्थ्यांना गणेशोत्सव, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि दिवाळी अशा विविध सणांच्या निमित्ताने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. अवघ्या १०० रुपयांत चाकूर तालुक्यातील अन्नसुरक्षा योजनेचे २३८४३, अंत्योदय ३०३२, शेतकरी गटाचे ४५५० अशी एकूण ३१ हजार ४२५ शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता.

या योजनेंतर्गत २०२४ मध्ये गौरी गणपती, दिवाळीमध्ये लाभार्थ्यांना एक लिटर पामतेल, एक किलो साखर, रवा आणि हरभरा डाळ यांचा समावेश असलेली कीट दिली होती. दोन वर्षानंतर बंद असलेला आनंदाचा शिधा दुष्काळ परिस्थितीत सुरु करणे गरजेचे असून भाववाढीने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. या योजनेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा संच उपलब्ध करून दिल्याने दिवाळीसह विविध सणांच्या काळात या योजनेचा लाभ मिळाल्याने अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत होता. मात्र, यंदाच्या दिवाळीतही दुष्काळजन्य परिस्थिती उद्धभवली असून आनंदाचा शिधाची आता नित्तांत गरज गरीब कुटुंबाना भासू लागली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. जनावरांसाठी चारा-पाणी मिळणे कठीण होत असताना पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

दुसरीकडे, शेतीच्या कामांवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना पुरेसा रोजगार मिळत नाही. बांधकाम क्षेत्रातील मजुरांनाही नियमित काम मिळण्याची शाश्वती नाही. उत्पन्नाचे स्रोत आटत असताना किराणा, खाद्यतेल, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चाचा भार मात्र कायम आहे. अशा वेळी गरीब कुटुंबांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असला, तरी अनेक कुटुंबांच्या घरात आर्थिक विवंचनेचे सावट आहे. सण साजरा करायचा की रोजच्या जेवणाची चिंता करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना 'आनंदाचा शिधा' मिळणे ही केवळ सणापुरती मदत नसून कठीण परिस्थितीत मिळणारा आधार ठरू शकतो.

त्यामुळे योजनेच्या खर्चाचा विचार करून पात्रा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि आनंदाचा शिधा द्यावा अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. शासनाने दुष्काळात गांभीर्याने लक्ष देवून दुष्काळात होरपळणाऱ्या गरीब कुटुंबांना सरकारने दिलासा द्यावा आणि यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा द्यावा, अशी अपेक्षा गरीब कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी ग्रामीण भागातून आनंदाचा शिधा वाटपाची मागणी जोर धरू लागली आहे.

दिवाळीपूर्वी 'आनंदाचा शिधा' वाटपाचा निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या ताटात दोन घास समाधानाचे पडले, तरच त्यांच्या दृष्टीने दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची ठरणार आहे.

यंदा दुष्काळ परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मदत जाहीर होते, परंतु शेतीत, बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या गरीब कुटुंबाना कुठेच मदत मिळत नाही. ही दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने आनंदाचा शिधा सुरू करावा, त्यात जिन्नस वाढवावे आणि दिवाळी

गोड करावी. - उषाबाई चव्हाण, महिला लाभार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT