डॉ. प्रतिभा थोरात यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश file photo
बीड

डॉ. प्रतिभा थोरात यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

केज मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली

पुढारी वृत्तसेवा

Dr. Pratibha Thorat's public entry into Shiv Sena

बीड, पुढारी वृत्तसेवा: केज विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून, बीड कामगार आरोग्य विमा विभागाचे संचालक डॉ. अशोक थोरात यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा थोरात यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिव-सेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे केज मतदारसंघात शिवसेनेचे बळ लक्षणीयरीत्या वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

डॉ. प्रतिभा थोरात यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनीही शिव-सेनेचा झेंडा हाती घेतला. यामध्ये उद्धव दळवी, प्रमोद पाटील, राजा शेख, नंदकुमार कावळे, इंद्रजीत मोरे, लाला काकडे, अशोक पांचाळ, दादासाहेब घुगे, जीवन थोरात, विलास अंबड, लालासाहेब शिंदे, दत्ता काकडे, अनिल जोगदंड, बजरंग काकडे, प्रकाश थोरात, योगेश नाईक यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

यापूर्वी माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या प्रवेशानंतर आता थोरात कुटुंबीयांचा सहभाग वाढल्याने केजमध्ये शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, डॉ. अशोक थोरात हे केजच्या राजकारणातील अनुभवी व धुरंधर व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक लढवली असून, दिवंगत मंत्री विमल मुंदडा यांच्या खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले डॉ. अशोक थोरात पुढील २३ महिन्यांत निवृत्त होणार असून, त्यानंतर ते सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पत्नीच्या प्रवेशातून केजमध्ये राजकीय बांधणीची स्पष्ट सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर केज विधानसभा मतदारसंघात आगामी काळात शिव सेना आणि भाजप यांच्यात थेट लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या राखीव असलेला हा मतदारसंघ डीलीमिटेशननंतर खुला होण्याची शक्यता असल्याने राज्यातील दिग्गजांचे लक्ष येथे लागले आहे. दरम्यान, पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केजच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून मतदारसंघात मजबूत संघटन उभारून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे डॉ. प्रतिभा अशोक थोरात यांनी सांगितले.

यांनी शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना असल्याचे सांगितले. या सोहळ्यास शिवसेना बीड लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, महिला संपर्कप्रमुख संगीता चव्हाण, विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ताकुमार काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. एकूणच, डॉ. प्रतिभा थोरात यांच्या प्रवेशामुळे केज मतदारसंघातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, आगामी निवडणुकांमध्ये हा बदल निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. अशोक थोरात हे केजच्या राजकारणातील धुरंधर खेळाडू मानले जातात. त्यांनी यापूर्वी ज्या पद्धतीने मतदारसंघाची बांधणी केली आहे, त्यावरून त्यांची ही राजकीय खेळी येणाऱ्या काळात केजच्या राजकारणाला पूर्णपणे ढवळून काढणारी ठरणार, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT