Dr. Atul Pethe : यशवंतरावांसारखी दूरदृष्टी आजच्या एकाही नेत्याकडे नाही !  file photo
बीड

Dr. Atul Pethe : यशवंतरावांसारखी दूरदृष्टी आजच्या एकाही नेत्याकडे नाही !

डॉ. अतुल पेठे यांची प्रतिपादन; अंबाजोगाईत स्मृती समारोहाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

Dr. Atul Pethe: Not a single leader today possesses the kind of far-sighted vision that Yashwantrao had!

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची व्यापक संकल्पना मांडताना साहित्य, संस्कृती, नाटक, शेती आणि सामाजिक संस्थांना समान महत्त्व देणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे सुसंस्कृत नेतृत्व पुन्हा निर्माण झाले नाही. भविष्याचा वेध घेणारी आणि महाराष्ट्राची आब राखणारी त्यांच्यासारखी दूरदृष्टी आजच्या एकाही नेत्याकडे दिसत नाही, अशी परखड टिप्पणी पुण्यातील लेखक, दिग्दर्शक व अभिनेते डॉ. अतुल पेठे यांनी केली.

अंबाजोगाईत गेल्या 42 वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्मृती समारोह समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे आणि सचिव दगडू लोमटे उपस्थित होते.

डॉ. पेठे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला. मात्र, या प्रवासात त्यांनी केवळ सत्ताकारणाला महत्त्व दिले नाही, तर देशाच्या जडणघडणीत संस्था या पायाभूत असतात, हा दूरगामी विचार समाजासमोर ठेवला. संगीत, कला, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजाचे स्वास्थ्य टिकून राहते, याची जाणीव त्यांनी करून दिली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे. अशा दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा अभाव आज प्रकर्षाने जाणवतो, अशा शब्दांत त्यांनी यशवंतरावांना अभिवादन केले.

आज देशात समाज जोडण्याऐवजी तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली समाजातील शांतता आणि सलोखा दुरावत चालला आहे. भेदाभेद, द्वेष, भाषावाद आणि प्रांतवादाच्या माध्यमातून समाजाचे विघटन केले जात असून धर्माधर्मांमध्ये दरी निर्माण केली जात आहे. द्वेषावर आधारित समाजरचना उभी राहत असल्याने संस्कृती आणि सामाजिक कार्य यांच्यातील नातेही कमकुवत होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण यांचे विचार समाजासाठी दिशादर्शक ठरतात. समाजातील संक्रमण हे चांगल्या विचारांतूनच घडत असते. विचारांची दिशा योग्य असेल, तर राष्ट्राची वाटचालही सुकर होते. आज समाजातील संवाद दिवसेंदिवस कमी होत चालला असून समाजाप्रती संवेदना जागृत करण्याची गरज आहे, असे आवाहनही डॉ. पेठे यांनी केले.

अंबाजोगाईकरांनी गेल्या 42 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा अखंडितपणे जपला आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कविता कराड-गित्ते यांचा स्मृती समारोह समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

दीपप्रज्वलन करून तसेच यशवंतराव चव्हाण आणि कै. भगवानराव लोमटे यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून समारोहाचे उद्घाटन करण्यात आले. दगडू लोमटे यांनी प्रास्ताविक केले. सतीश लोमटे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, तर अमृत महाजन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. मेघराज पवळे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश लोमटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT