बीड : परळीतील महादेव मुंडे यांचा 18 महिन्यापूर्वी खून झाला होता. या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. आरोपी देखील अटक नाहीत याच प्रश्नावर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज सकाळी त्या पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी आतदहन करण्यापासून रोखले. परंतु पोलीस अधीक्षकांची भेट झाल्यानंतर परत जात असताना त्यांनी विष प्राशन केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. त्यांना बीडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
परळी येथील महादेव मुंडे यांचा धारदार शास्त्राचे वार करून 18 महिन्यापूर्वी खून झाला होता. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत सात ते आठ अधिकारी बदलले आहेत. तरीदेखील तपास होऊ शकलेला नाही. काही दिवसांपूर्वी बीडच्या पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती केली होती, तरी देखील तपास लागू शकलेला नाही. यामुळे आपल्या पतीच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी प्रशासन चालढकल का करत आहे? असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केला होता. तसेच आठ दिवसापूर्वी त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज महादेव मुंडे यांचे कुटुंबीय बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्याकडून आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले, त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. परंतु मुंडे यांचे कुटुंबीय परतत असताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.