Diwali of potholes celebrated in Ambajogai
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या प्रकाशात उजळणाऱ्या अंबाजोगाई शहरात यंदा दिवे रस्त्यांवर नव्हे तर खड्ड्यामध्ये पेटले ! शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि प्रशासनाचे मौन पाहून संतप्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. पाडव्याच्या दिवशी त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये दिवे, मेणबत्त्या, रांगोळ्या आणि पुष्पहार ठेवून खड्ड्यांची दिवाळी साजरी केली. हा आगळा-वेगळा निषेध पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अंबाजोगाई शहरातील सिमेंट रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून कामे केली. मात्र काही महिन्यांतच रस्त्यांवर शेकडो खड्डे, भेगा आणि उखडलेले सिमेंट दिसू लागले. पावसात या खड्ड्यांत पाणी साचल्याने नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. अनेक दुचाकीस्वारांना अपघातांचाही सामना करावा लागला.
आम्ही कररूपाने शासनाला कष्टाचे पैसे देतो, पण तेच पैसे खड्ड्यांमध्ये जात आहेत, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. गणेश ोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी सर्व सण संपले तरी रस्त्यांचे दुःख कायम असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, अनेक ठिकाणी रस्ते वर आणि नाल्या खाली, तर काही ठिकाणी नाल्या उंच असल्याने पावसाचे पाणी थेट घरात, दुकानात आणि मंदिरात शिरले. अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे शासनाचे हजारो कोटी रूपये अक्षरशः वाया गेले आहेत.
स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी खड्ड्यांमध्ये दिवे लावले, रांगोळ्या काढल्या आणि फटाके फोडून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, खड्डे बुजविण्या ऐवजी आम्हालाच आता त्यांची पूजा करावी लागते हेच आमचे दुर्दैव। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा देत राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांबाबत आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे लवकरच तक्रार करणार आहोत.
दरम्यान, नागरिकांनी अंबाजोगाईतील सर्व मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि दर्जा तपासणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मात्र अजूनही रस्त्यांवर खड्डे आणि लोकांच्या चेहऱ्यावर असंतोषच दिसतोय.