अतुल शिनगारे
धारूर : धारूर शहरासह संपूर्ण तालुक्यात सध्या एका वेगळ्याच संकटाने मूळ धरले आहे. हातातील खेळण्यांच्या वयात आणि अभ्यासाच्या काळात तरुण पिढी ’मोबाईल व्यसनाच्या’ आहारी गेल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. शिक्षण आणि मनोरंजनाच्या नावाखाली सुरू झालेला हा प्रवास आता मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडवण्यापर्यंत पोहोचला असून, धारूर मधील पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या अनेक विद्यार्थी अभ्यासाचे नाव सांगून पालकांकडून मोबाईल घेतात. मात्र, प्रत्यक्षात पुस्तकांऐवजी स्क्रीनवर ऑनलाईन गेम्स, इंस्टाग्राम रील्स आणि शॉर्ट व्हिडिओज तासन्तास पाहिले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी घट झाली असून, त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती धोक्यात आली आहे.
रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या निळ्या प्रकाशात डोळे खुपसून बसणाऱ्या तरुणांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, यामुळे मानसिक समस्या: चिडचिड होणे, तणाव, नैराश्य आणि टोकाची मानसिक अस्थिरता. शारीरिक व्याधी: डोळ्यांचे विकार, तीव्र डोकेदुखी आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे येणारा अशक्तपणा ही लक्षणे दिसत आहेत. दरम्यान मुलांच्या मानसिकतेवर देखील या मोबाईलचा परिणाम झाला असून मोबाईल काढून घेतल्यास मुले आक्रमक होत असून घरात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल अनिवार्य झाला असला, तरी आता त्याचा वापर व्यसनाकडे झुकला आहे. वर्गातील विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष कमी झाले असून शिस्तीचा प्रश्नही गंभीर होत आहे.केवळ पालकच नाही, तर आता शिक्षण विभाग आणि प्रशासनानेही या सामाजिक समस्येकडे गांभीर्याने पाहून जनजागृतीपर मोहिमा राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा, भविष्यात या ‘डिजिटल व्यसनाचे’ भयावह परिणाम धारूरच्या सामाजिक जडणघडणीवर होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या वाढत्या धोक्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रित येणे गरजेचे आहे. यावर तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले असून मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांत गुंतवणे. याबरोबरच मोबाईल वापरासाठी ठराविक वेळेचे काटेकोर नियोजन करणे आणि वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी त्यासाठी मोबाईलऐवजी पुन्हा पुस्तकांकडे वळवण्यासाठीचे प्रयत्न करणे गरजेचे आहेत.