बीड

Dharur News : मोहखेड येथे केळीच्या बागेला भीषण आग

शेतकऱ्याचे १५ लाखांचे नुकसान; साडेपाच हजार झाडे जळाली

पुढारी वृत्तसेवा

Dharur News: Massive Fire Engulfs Banana Plantation at Mohkhed

धारूर, पुढारी वृत्तसेवा धारूर तालुक्यातील मो-हखेड येथे बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत शेतकरी तथा माजी सरपंच रणधीर सुभाषराव सोळंके यांच्या चार एकरांवरील केळीची बाग पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत सुमारे साडेपाच हजार केळीची झाडे नष्ट झाली असून अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहखेड येथील गट क्रमांक १२८ मधील चार एकर क्षेत्रात रणधीर सोळंके यांनी मोठ्या कष्टाने केळीची लागवड केली होती. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण देखभाल आणि मेहनतीमुळे केळीची बाग चांगल्या अवस्थेत आली होती.

काही दिवसांतच उत्पादन हाती येण्याची अपेक्षा असताना बुधवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक बागेत आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच रणधिर सोळंके यांच्यासह सचिन सोळंके, अनिल सोळंके, विठ्ठल उजगरे, गंगाराम उजगरे, आबा शिनगारे, बजरंग डोंगरे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

मात्र भर दुपारचे कडक ऊन, वाढलेली उष्णता आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आगीच्या भडक्यात संपूर्ण केळीची बाग अक्षरशः भस्मसात झाली. या आगीत जवळपास साडेपाच हजार केळीची झाडे पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र अधिकृत कारण स्पष्ट होण्यासाठी संबंधित विभागाच्या तपासाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. "कष्टाने उभे केलेले पीक काही क्षणांत राख झाले," अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत होते. या घटनेनंतर महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी रणधिर सोळंके यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चार एकरांमध्ये मोठ्या कष्टाने केळीची बाग उभी केली होती. दिवस-रात्र मेहनत घेऊन पीक जोपासले; पण काही क्षणांत सर्व काही राख झाले. डोळ्यांसमोर उभे पीक जळताना पाहून काय करावे हेच सूचत नव्हते. शासनाने तातडीने मदत करावी, अन्यथा आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगायचे कसे?
रणधीर सोळंके, नुकसानग्रस्त शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT