नगरपरिषदेच्या गाळ्यांचा लिलाव रखडला pudhari photo
बीड

Dharur municipal shop allotment issue : नगरपरिषदेच्या गाळ्यांचा लिलाव रखडला

व्यापारी व नागरिकांकडून तत्काळ कारवाईची मागणी; दुर्लक्षामुळे आर्थिक फटका

पुढारी वृत्तसेवा

अतुल शिनगारे

धारूर ः धारूर नगरपरिषदेकडून व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर नव्या गाळ्यांची (दुकानांची) उभारणी करण्यात आली असून सुमारे शंभराच्या आसपास दुकाने नव्याने उभी करण्यात आली आहेत. मात्र ही दुकाने पूर्णत्वास येऊनही अद्याप लिलावाच्या प्रतीक्षेत असल्याने अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहेत. परिणामी नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

मागील सहा - सात वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी होते त्यांनी धारूर येथील व्यवसाय कला गाळे दुकान उपलब्ध होतील या उद्देशाने सुरू केलेले होते. काम मोठ्या प्रमाणात पूर्णही झाले होते. तसेच उर्वरित प्रशासकीय काळात या गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले होते.

काही ठिकाणी किरकोळ लहान-मोठी कामे अद्याप शिल्लक असली तरी बहुतांश दुकाने व्यवसायासाठी सज्ज आहेत. तरीदेखील लिलाव प्रक्रिया रखडल्याने ही दुकाने वापराविना पडून आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत या दुकानांच्या मेंटेनन्ससंबंधी कामे निघणार असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

नागरिक व व्यापारी वर्गाच्या मते, नगरपरिषद प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर जाहीर करावा. त्यामुळे नव्या व्यवसायासाठी इच्छुक असलेल्या युवकांना संधी मिळेल आणि शहरातील रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. तसेच, या गाळ्यांच्या लिलावातून नगरपरिषदेला डिपॉझिट स्वरूपात कोट्यवधी रुपये मिळू शकतात, तर भाड्यापोटी दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळण्याची शक्यता आहे.

मात्र लिलाव रखडल्यामुळे नगरपरिषदेला या संभाव्य उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत नगरपरिषदेला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असून, हे नुकसान भरून काढणार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.जर ही दुकाने वेळेत लिलावाद्वारे वितरित करण्यात आली असती, तर मिळणारा निधी शहरातील विकासकामांसाठी उपयोगात आणता आला असता. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा निधी थांबलेला असून विकासकामांनाही फटका बसत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून लिलाव प्रक्रिया सुरू करावी, नसता नगरपालिकेचे होणारे नुकसान मुख्याधिकारी यांच्या कडून वसूल करावे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष देऊन नगरपरिषदेचे होत असलेले नुकसान थांबवावे व गाळे इच्छुकांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी धारूर शहरातील व्यापारी व नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT