Diwali Market Slowdown pudhari photo
बीड

Beed Drought : दुष्काळाच्या झळा दिवाळीच्या बाजारपेठेलाही

ऊसतोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर; किराणा, कापड अन् विद्युत रोषणाईच्या व्यवसायावरही परिणाम

पुढारी वृत्तसेवा

धारूर : यंदाच्या दुष्काळाने शेतशिवारासोबतच आता दिवाळीच्या बाजारपेठेलाही मंदीच्या खाईत ढकलले आहे. वर्षभरातील सर्वांत मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीत धारूर शहरातील बाजारपेठेत अपेक्षित आर्थिक उलाढाल होत नसल्याचे चित्र आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हातात पैसा नसल्याने खरेदीचा उत्साह ओसरला असून, किराणा, कापड, फटाके आणि विद्युत रोषणाईसह विविध व्यवसायांना मंदीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः फटाके विक्रीत तब्बल ६० ते ७० टक्क्यांची घट झाल्याने विक्रेत्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दिवाळी म्हटले की बाजारपेठेत होणारी गर्दी, नवीन कपड्यांची खरेदी, फराळाचे साहित्य, घराची सजावट, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी असे उत्साहाचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. या सणाच्या काळात व्यापाऱ्यांना वर्षभराच्या व्यवसायातील महत्त्वाची उलाढाल मिळते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांच्या खर्चावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ असली तरी खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

अनेक व्यवसायांमध्ये उलाढाल ५० टक्क्यांहून अधिक घटल्याची परिस्थिती आहे. धारूर तालुका हा ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथील अनेक अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती व मजुरी वर अवलंबून आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.

शेतातील रोजगारही कमी झाला. त्यामुळे दसऱ्यानंतरच अनेक कुटुंबांनी ऊसतोडणीसाठी जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यांत स्थलांतर केले आहे. दिवाळीच्या काळात गावात राहणाऱ्या या कुटुंबांकडून होणारी खरेदी बाजारपेठेच्या उलाढालीत महत्त्वाची असते. मात्र, मजुरांचे स्थलांतर झाल्याने ग्राहकांची संख्या घटली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक व्यापारावर झाला आहे.

दिवाळीनिमित्त धारूर शहरात फटाके विक्रीचा व्यवसाय दरवर्षी मोठ्या तेजीत होतो. यंदाही आम्ही विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली होती. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतर यामुळे फटाके विक्रीला मोठा फटका बसला आहे. विक्रेत्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे असे सुनिल कावळे यांनी सांगितले.

फटाके विक्रेत्यांचे भांडवल अडकले

दिवाळीच्या काही दिवसांत मोठी उलाढाल होणारा फटाके विक्रीचा व्यवसाय यंदा सर्वाधिक अडचणीत सापडला आहे. दरवर्षीच्या विक्रीचा अंदाज घेऊन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा माल खरेदी केला होता. मात्र, ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात माल शिल्लक राहिला आहे. ६० ते ७० टक्के फटाके विक्रीविना पडून असल्याने विक्रेत्यांचे भांडवल अडकले आहे. अपेक्षित नफा तर दूरच, गुंतवलेली मुद्दल रक्कमही वसूल होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनंतरही मंदीचे सावट

दिवाळीचा सण संपल्यानंतरही बाजारपेठेतील मंदी कायम राहण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे. किराणा, कापड, विद्युत रोषणाई आणि अन्य व्यवसायांमध्ये अपेक्षित उलाढाल होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात आहेत, तर दुसरीकडे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शहरातील व्यापाऱ्यांनाही त्याची झळ बसत आहे. त्यामुळे दुष्काळाचे परिणाम आता केवळ शेतीपुरते मर्यादित राहिले नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेची साखळीच प्रभावित होत असल्याचे धारूरच्या बाजारपेठेतील चित्रातून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT