Kej Georai Dharur Dhangar protest
केज, गेवराई, धारूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा आणि दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेळ्या-मेंढ्या रस्त्यावर सोडून रस्ता रोको आंदोलन केले.
दि. १ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास धनगर बांधवांनी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या शेळ्या मेंढ्यासह रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेळ्या आणि मेंढ्या रस्त्यावर सोडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा. तसेच धनगर समाजाचे नेते दिपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले. या रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्ग क्र. ५४८-सी आणि ५४८-डी या रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी धनगर बांधवांच्या वतीने देण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी स्वीकारले तर यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मांजरमे मंडळ अधिकारी नन्नवरे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.
गेवराई: धनगर समाजाला एस.टी. आरक्षण तातडीने देण्याच्या मागणीसाठी आज (दि. १) उमापूर फाट्यावर समाज बांधवांनी एक तास रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे गेवराई–शेवगाव राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
जालना येथे १७ सप्टेंबर २०२५ पासून दीपक बोराडे हे एस.टी. आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. दीर्घकाळ उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी धनगर समाज बांधवांपर्यंत पोहोचली आणि समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. याच निषेधार्थ उमापूर सर्कलच्या वतीने समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन सकाळी अकरा वाजता गेवराई तालुक्यातील उमापूर फाट्यावर महामार्गावर रस्तारोको आंदोलन छेडले.
धनगर समाजाचे म्हणणे आहे की, मेंढपाळ, धनगर, हाटकर हे समाज पारंपरिकपणे भटकंती करणारे असून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. तरीसुद्धा अनेक वर्षांपासून आरक्षणाचा न्याय त्यांना मिळालेला नाही. एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी, या मागणीसाठी समाज सातत्याने संघर्ष करीत आहे. आंदोलनस्थळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेवटी सकाळ धनगर समाज उमापूर सर्कलच्या वतीने उपनिरीक्षक पानपाटील यांनी प्रशासनाकडे निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलन संपुष्टात आले.
धारूर: धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने धारूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान समाजबांधवांनी शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले.
धारूर येथील सकल धनगर समाजाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी माधव तात्या निर्मळ, यशवंत गायके, बालासाहेब चव्हाण यांनी आरक्षण मागणी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सुधीर शिनगारे, बालासाहेब चव्हाण, विश्वास शिनगारे, गणेश सावंत, गौतम चव्हाण सह मावळे आंदोलनात उपस्थित होते.
याप्रसंगी समाजाच्या वतीने धारूर तहसीलदार श्रीकांत निळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.