बडेवाडी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या वतीने आयोजित अखंड नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात बोलताना आ.धनंजय मुंडे. pudhari photo
बीड

MLA Dhananjay Munde : नियती सर्वांचा हिशोब नीट करते

आ.धनंजय मुंडे यांचा सूचक इशारा, बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

बीड : राज्यातील राजकारणात अलीकडच्या काळात आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आणि वैयक्तिक आरोपांच्या फैरी झडत असताना, आपण कोणाला दोष द्यायचा नाही आणि कुणाचा द्वेष करायचा नाही; नियती सर्वांचा हिशोब नीट करते, असे सूचक विधान करत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. त्यांच्या या विधानाकडे सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संकेत म्हणून पाहिले जात आहे.

बडेवाडी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या वतीने आयोजित अखंड नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. अलीकडच्या काही महिन्यांत राज्यातील सत्तासमीकरणे, स्थानिक राजकारणातील मतभेद आणि वैचारिक संघर्ष यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंडे यांनी संयम, सहनशीलता आणि नियतीवर विश्वास ठेवण्याचा संदेश देत अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केल्याचे मानले जात आहे.

यावेळी भगवानगडाच्या परंपरेचा गौरव करताना मुंडे म्हणाले की, भक्ती, शक्ती आणि विश्वास या त्रिसूत्रीवर उभा असलेला भगवानगड हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. लाखो ऊसतोड कामगार आपल्या कष्टाच्या कमाईतून देणगी देतात आणि त्यातूनच या गडाची महती देश-विदेशात पोहोचली आहे. संत भगवान बाबांनी निर्माण केलेली ही ऐश्वर्यसंपन्न परंपरा आजही अखंड ठेवण्याचे काम डॉ. नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

भगवानगड हे प्रेरणा व ऊर्जेचे स्थान असून, या गडाच्या सान्निध्यात कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळते, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर महंत डॉ. नामदेव शास्त्री, कृष्णा महाराज शास्त्री, महंत राधा सानप, खा. नीलेश लंके, आ.मोनिका राजळे, माजी आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.प्रताप ढाकणे, प्रा. लक्ष्मण हाके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी बडेवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी मुंडे यांचे जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. या स्वागताने स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बडेवाडी येथील कार्यक्रमापूर्वी मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभालाही उपस्थिती लावली. येथे त्यांनी गडाचे महंत शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी आ. विजयसिंह पंडित यांचीही उपस्थिती होती. दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आ.सुरेश धस यांच्या व्हायरल व्हिडीओचा तर याला संदर्भ नाही ना अशी चर्चा आता रंगत आहे.

आष्टीचा व्हिडीओ व्हायरल आणि मुंडेंचे वक्तव्य !

कालच आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील यात्रेत नृत्यांगना सोबत आ.सुरेश धस यांचा ढोल वाजवितानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आज धनंजय मुंडे यांचे नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातून केलेले हे वक्तव्य यावरून आता सर्वत्र चर्चांना उत आला असून कोणती मोठी राजकीय घडामोड होणार असल्याचे संकेत तर मुंडे यांनी दिलेत का? या बाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT