अपघातात चक्काचूर झालेली कार Reprentive Photo
बीड

भावा-बहिणीवर काळाचा घाला

आंध्रप्रदेशातील भाविकांचा केजजवळ भीषण अपघात !

पुढारी वृत्तसेवा

केज, पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथून देवदर्शन करून आंध्रप्रदेशकडे जाणाऱ्या भविकांच्या कारने बुधवारी (दि.26) कोरेगाव फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गाडीमधील दोघे बहीण भाऊ जागीच ठार झाले. तर पाठीमागच्या सीटवर बसलेले दोघे गंभीर जखमी आहेत. या अपघातात ट्रक जवळ उभा असलेला ट्रक ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे. अपघातातील दोन मयत आणि दोन जखमी हे सर्वजण आंध्रप्रदेश राज्यातील रहिवाशी आहेत. तर ट्रक ड्रायव्हर हा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवाशी आहे.

या बाबतची माहिती अशी की, बुधवार दि. (26) पहाटे बीडकडून अंबाजोगाईच्या दिशेने माल घेवून जाणारी ट्रक क्र. (एम एच 44 एबी-8786) हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखॉन पठान (रा. पाटोदा जि. बीड) यांना त्यांच्या ट्रक मधील मालाची चोरी झाली असा संशय आल्याने त्यांनी ट्रक रस्त्यात थांबवून ट्रकची पाहणी करीत होते. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कार क्र. (एपी 39 एसएस 5657) ने उभ्या ट्रकला जोराची धडक दिली.

या अपघातात कारचालक साईकृष्णा वामसी श्रीनिवासराव जोन्नालगड्डा (वय. 27, रा. जंगला पेठ, सिवलायम नुझविड, इलुरू) तसेच त्याची बहीण रमयाकृष्णा व्यंकटा नरसिंहराव मंडवा (वय 37, पेडावुटपल्ली जोसेफ तम्बी टेम्पल एरिया कृष्णा) हे जागीच ठार झाले. तर कारच्या मागील सीटवर बसलेले श्रुती संकुता, (रा. गुडीवाडा आंध्रप्रदेश) आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलीस नाईक राजू गुंजाळ, शेख रशीद हे घटनास्थळी रवाना झाले. तसेच जखमींना मदत केली. दोन्ही मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवले आहेत. जखमींवर केज येथे प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

एअर बॅग उघडून सुद्धा नाही वाचला जीव

हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकला धडक बसताच कार मधील सुरक्षेसाठी असलेल्या एअर बॅग उघडल्या होत्या. मात्र जास्त गतीमध्ये कार असल्याने कार चालक आणि त्याच्या शेजारी असलेल्या महिलेचा जीव वाचला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT