Crime News pudhari photo
बीड

Beed Crime : आश्रमशाळा की शिक्षक, कर्मचाऱ्यांची छळछावणी?

मारहाणीच्या घटनेनंतर अनेक प्रकार आले समोर; उच्चस्तरीय समितीकडून तपासणी गरजेची

पुढारी वृत्तसेवा

उदय नागरगोजे

बीड : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आश्रम शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या पतीला संस्थाचालकाने कार्यालयातच मारहाणीची घटना घडली होती. यानंतर आता आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संस्थाचालकाकडून होत असलेल्या छळाच्या अनेक कथा समोर येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी आत्महत्येसारख्या घटनादेखील घडल्या असून या सर्वांची दखल घेऊन उच्चस्तरीय समितीकडून सर्वच आश्रमशाळांचे ऑडिट करण्याची मागणी आता होत आहे.

बीड तालुक्यातील अंथरवण पिंप्री येथे स्वयंपाकी म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा चव्हाण यांचे पती सतीश राठोड हे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात आले होते. संस्थाचालक गेल्या सहा महिन्यांपासून शाळेवर येऊ देत नाही, सही करू देत नाही अशी त्यांची तक्रार होती. नेमके त्याच वेळी संस्थाचालक दिनेश पवार हे देखील त्या ठिकाणी आले.

यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, यात दिनेश पवार यांनी सतीश राठोड यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

गंभीर बाब म्हणजे सुरेखा चव्हाण या आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून कार्यरत असताना संस्थाचालकाच्या घरची कामे सांगितली जात होती असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, हा एक प्रकार समोर आल्यानंतर आश्रमशाळांच्या संस्थाचालकांकडून होत असलेल्या छळाचे अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत.

यामध्ये फरकाची रक्कम आल्यानंतर ती संस्थाचालकाला न दिल्यास कारवाई, संस्थाचालकाची इतर कामे केली नाही तरी कारवाई केली जाते अथवा कारवाईची धमकी दिली जाते, याबाबत तक्रार केल्यानंतरही प्रशासनाकडून फारसा काही प्रतिसाद मिळत नाही असा अनुभव अनेकांना आल्याने तक्रार करण्यासही कोणी फारसे धजावत नसल्याचे दिसते.

बीड जिल्ह्यात एकूण 45 आश्रमशाळा कार्यरत असून जवळपास साडेसातशे शिक्षक, कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची हजेरी ऑफलाईन पद्धतीने नोंदवली जाते, आणि त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा देखील आरोप होत आहे.

शिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी ऑफलाईन!

आश्रमशाळांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलामागे 2 हजार 200 रुपयांचे अनुदान भोजनासाठी दिले जाते. तसेच शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या पगारावरही शासन कोट्यावधी रुपये खर्च करते. एव्हढा खर्च शासन यावर करत असतांना हजेरीसाठी मात्र ऑफलाईन पद्धत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आश्रमशाळांमधील कारभार सुधारायचा असेल आणि पारदर्शकता आणायची असेल तर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची ऑनलाईन हजेरी सुरु करण्याची मागणी केली जात आहेत.

आश्रमशाळांमध्ये जर एखाद्या शिक्षक, कर्मचाऱ्याला त्रास दिला जात असेल, नियमबाह्य कामे सांगितली जात असतील तर त्यांनी रीतसर तक्रार करावी, आम्ही त्या तक्रारीची शहानिशा करून कारवाई करू. लेखी तक्रार करण्यास अडचण असेल तर थेट येऊन तोंडी तक्रार केली तरीही आम्ही याबाबत सकारात्मक विचार करू. तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत देखील निर्देश दिले जातील.
दत्तात्रय क्षीरसागर, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT