Decrease in water discharge from Jayakwadi; It is essential for villagers to be alert
सुभाष मुळे
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशयातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आज दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी घट करण्यात आली आहे. दुपारी ४.४५ ते ५.०० या वेळेत धरणाचे द्वार क्रमांक १० ते २७ असे एकूण १८ दरवाजे अर्धा फूटाने खाली करून आता प्रत्येकी १ फूटावर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे गोदावरी नदीपात्रातील विसर्गात ९४३२ क्युसेकने घट होऊन सध्या एकूण १८८६४ क्युसेक इतका विसर्ग सुरू राहील. दरम्यान, गे-वराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात अजूनही लक्षणीय प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता आवश्यक आहे.
विसर्गातील घट झाल्याने पाण्याचा वेग थोडासा कमी होणार असला तरीही नदीकाठच्या गावांनी सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तालुक्यातील गंगावाडी, सावळेश्वर, नागझरी, म्हाळस पिंपळगाव तसेच नदीलगतच्या इतर गावांतील शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पिके, जनावरे व मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलविणे तसेच नदीपात्राजवळ जाणे टाळावे, धरण क्षेत्रातील पाण्याची आवक व हवामानातील बदल लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उत्तर), पैठण यांनी दिली आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात आवक कायम असल्यामुळे विसर्गात बदल शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.