Crime against former sarpanch, engineers and Gram Sevak
धारूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सुर नरवाडी येथे ग्रामपंचायतीला शासनाकडून मिळालेल्या चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत अनियमितता आणि अपहार करण्यात आला. एकूण १७ लाख ७९ हजार रुपयांचा भ्रष्टाचार प्रशासनाच्या चौकशीनंतर समोर आला आहे. आ. प्रकाश सोळंके यांच्या तक्रारीनंतर ही चौकशी सुरू झाली होती. याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तत्कालीन महिला सरपंच, दोन माजी ग्रामसेवक आणि २ शाखा अभियंता यांच्या विरोधात सिरसाळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
धारूर तालुक्यातील सुरनरवाडी ग्रामपंचायतीने पंधरावा वित्त आयोग आणि रोजगार हमी योजनेच्या कामात अपहार केल्याची तक्रार आ. प्रकाश सोळंके यांनी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिली होती. त्यानंतर माजलगाव गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने चौकशी करून ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला होता.
या अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अनियमितता आणि अपहार याबाबत जबाबदारी निश्चित करून सरपंच लता चंद्रसेन काळे, प्रशासक तथा शाखा अभियंता बी. एन. पवार, ग्रामसेवक आर. के. चौरे, ग्रामसेवक विजय राठोड व शाखा अभियंता एम. एल. सय्यद यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवला होता. सर्वांनी खुलासे सादर केले होते. मात्र हे खुलासे अमान्य करण्यात आले. याप्रकरणी ५ लाख ३१ हजार ८९९ रुपयांची अनियमितता आणि १२ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे विस्तार अधिकारी बाबूराव राऊत यांच्या तक्रारीवरून सुरनरवाडीच्या माजी सरपंच लता चंद्रसेन काळे, शाखा अभियंता तथा तत्कालीन प्रशासक बी. एन. पवळ, माजी ग्रामसेवक आर. के. चौरे, ग्रामसेवक विजय राठोड, शाखा अभियंता एम. एल. सय्यद यांच्याविरोधात सिरसाळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत आ प्रकाश सोळंके यांनी या अपहरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास सिरसाळा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दहिफळे करीत आहेत.
शासनाच्या १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून हायमास्ट दिवे बसवणे, सौर पथदिवे बसवणे, अंगणवाडी खेळणी खरेदी, पाण्याचा हौद बांधणे, भूमिगत नाली बांधकाम, कचराकुंडी बसवणे, एलईडी खरेदी, ग्रामपंचायतीला फर्निचर खरेदी, विंधन विहिरी, जि. प. शाळा दूरस्ती या कामात हा अपहार झाला व अनियमितता झाली. चौकशी अहवालामध्ये सर्वांनी आपल्या पदाचा वापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे काम केल्याचे म्हटले आहे. पद व मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवला गेला आहे. त्यामुळे सर्वांवर गुन्हा नोंद करण्याची शिफारस करण्यात आली होती.
सरपंच काळे यांच्या काळात १४ व्या वित्त आयोगात २ लाख ६५,९४९ रुपये, १५ व्या वित्त आयोगात ३ लाख ३५ हजार ३४९ रुपये असा एकूण ६ लाख १ हजार २९९ रुपये, तर शाखा अभियंता पवळयांच्या प्रशासक काळात १ लाख ४८ हजार रुपयांचा अपहार झाला आहे. ग्रामसेवक आर. के. चौरे यांच्या काळात ४ लाख ८३ हजार ३४९ रुपयांचा अपहार झाला आहे. ग्रामसेवक विजय राठोड यांच्या काळात २ लाख ६५ हजार ९४९ रुपयांचा अपहार आहे. शाख अभियंता सय्यद यांनी २ लाख ८१ हजार ६५१ रुपयांचा अपहार झाल्याचा चौकशीअंती समोर आले.