Complaint Filed Alleging Death Threat with a Pistol; Case Registered Against Dhananjay Deshmukh
बीड, पुढारी वृत्तसेवा : मसाजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाची पिस्टल माझ्या डोक्याला लावून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची तक्रार समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात आता धनंजय देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान खिंडकर व त्यांचे मित्र हे रविवारी रात्री एका हॉटेलवर जेवण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी रील स्टार रविराज साबळे व धनंजय देशमुख हे जेवण करत होते. त्या ठिकाणी समाधान खिंडकर यांनी रील बनवणे सुरू केले असता त्या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने समाधान खिंडकर यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. यावर मी त्यांना माझे फोन का घेतला असे समाधान खिंडकर यांनी विचारल्याचे म्हटले.
यावेळी धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी पळत आले व तुला संपवून टाकीन असे म्हणत त्यांनी अंगरक्षकाच्या कमरेची पिस्टल काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्याला लावली आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अशी तक्रार खिंडकर यांनी केली आहे. या प्रकरणी आता बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जात आहे.
दरम्यान याबाबत धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार झालेला नाही, अंगरक्षक स्वतः असा प्रकार झालेला नाही असे सांगत असताना देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत मी आता मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली असून त्यांना भेटणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.