अंबाजोगाईत बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला pudhari photo
बीड

Beed Crime : अंबाजोगाईत बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

शिकवणी परिसरात तिघांचा दांडक्याने हल्ला; गंभीर विद्यार्थ्यावर लातूरमध्ये उपचार

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : शैक्षणिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या अंबाजोगाई शहरात गुंडगिरीचे प्रकार पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील ट्युशन परिसरात बारावीच्या विद्यार्थ्यावर तिघांनी लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७) रात्री घडली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. आशिष विनोद माने (१७, रा. रेपेवाडी, ता. अंबाजोगाई, सध्या माळीनगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा अभ्यासिका संपवून पायी आपल्या राहत्या खोलीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीने त्याला अडविले. सुरुवातीला शिवीगाळ करत वाद घातल्यानंतर एका आरोपीने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत आशिषला अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला लातूर येथे हलविण्यात आले.

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कागणे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील ट्युशन व अभ्यासिका परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ट्युशन परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

घटनेनंतर पालक आणि नागरिकांनी ट्युशन, अभ्यासिका व विद्यार्थी वस्ती परिसरात नियमित पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके नियुक्त करून गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अंबाजोगाईची शैक्षणिक आणि सांस्कृतिक ओळख कायम राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची भावना शहरातील सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT