Cat Swallowed Gold Ring pudhari photo
बीड

Beed News : जावयाच्या धोंड्याच्या आहेरावर मांजराचा डल्ला!

Cat Swallowed Gold Ring : अधिक मासातील आहेराची भन्नाट कहाणी; अखेर शस्त्रक्रियेनंतर मिळाला सोन्याचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

शिवनाथ जाधव

टाकरवण : अधिक मास म्हटला की जावईबापूंचा मान-सन्मान, सासुरवाडीतील पाहुणचार, गोडधोड जेवण आणि सोन्या-नाण्यांचे आहेर हे ठरलेलेच. पण टाकरवण परिसरातील एका गावात अधिक मासाच्या निमित्ताने घडलेला प्रकार ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. कारण जावईबापूंना देण्यासाठी तयार ठेवलेली सोन्याची अंगठी थेट घरातील मांजरानेच गिळंकृत केली आणि संपूर्ण कुटुंबाला अक्षरशः चार दिवस सोन्याच्या शोध मोहिमेवर जावे लागले!

घटनेनुसार, अधिक मासानिमित्त लेक आणि जावयाला धोंडे जेवणासाठी सासुरवाडीत बोलावण्यात आले होते. जावईबापूंचा मान राखण्यासाठी सासूबाईंनी खास पाच ग्रॅम सोन्याची अंगठी बनवली होती. ती अंगठी जावयाला सरप्राईज म्हणून देण्याचा बेत होता. म्हणून अंगठी एका पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवण्यात आली होती.

घरात पाहुण्यांची लगबग, स्वयंपाकाची धांदल आणि जावईबापूंच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच अचानक घरातील एका मिशीवाल्या पाहुण्याने एंट्री घेतली. सर्वांचे लक्ष दुसरीकडे असताना त्या मांजराने अंगठी लपवलेला धोंडा एका घासात फस्त केला!

क्षणात आनंदाच्या वातावरणात खळबळ उडाली. सासूबाईंच्या चेहऱ्यावरील आनंद गायब झाला आणि घरातील पुरुष मंडळींनी तातडीने मांजराचा शोध घेतला. काही वेळातच आरोपी मांजराला पकडून एका सुरक्षित ठिकाणी बांधण्यात आले. मात्र तोपर्यंत अंगठीचा पुरावा त्याच्या पोटात जमा झाला होता. दरम्यान, जावईबापूंना सुरुवातीला काहीच कळले नाही. मात्र घरातील धावपळ पाहून त्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकार सांगण्यात आला.

अखेर अंगठी नंतर देण्याचे आश्वासन देत जावईबापूंचा मान राखण्यात आला आणि कपडे देऊन त्यांची बोळवण करण्यात आली.यानंतर सुरू झाला अंगठी परत मिळविण्याचा खरा संघर्ष. पुढील चार दिवस मांजरावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. “आज बाहेर पडेल, उद्या बाहेर पडेल,“ या आशेवर घरच्यांनी पहारा दिला. पण अंगठी काही हाती लागली नाही. उलट मांजर मात्र निर्धास्तपणे फिरत राहिले.अखेर घरच्यांनी पशुवैद्यकांचा सल्ला घेतला. मांजराला उलटी होण्यासाठी औषध देण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू झाला. त्यामुळे अंगठी परत मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला.

शेवटी पशुवैद्यकीय शस्त्रक्रियेद्वारे मृत मांजराच्या पोटाची तपासणी करण्यात आली आणि सर्वांना ज्याची प्रतीक्षा होती ती सोन्याची अंगठी अखेर सुरक्षित अवस्थेत सापडली. अंगठी मिळाली खरी; पण त्यासाठी एका मुक्या जीवाचा बळी गेल्याने कुटुंबीयांमध्ये हळहळही व्यक्त करण्यात आली.या अजब-गजब घटनेची चर्चा सध्या टाकरवण परिसरात चांगलीच रंगली आहे. जावयाचा आहेर, सोन्याची अंगठी, धोंडा आणि मांजर यांचा हा अनपेक्षित संगम गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

जावयाचा मान की मांजराची मेजवानी?

जावईबापूंसाठी ठेवलेली सोन्याची अंगठी जावयाच्या बोटात जाण्याऐवजी थेट मांजराच्या पोटात गेल्याने गावात एकच हशा पिकला. “जावयाचा मान वाढवायचा होता; पण मांजरानेच सोन्याचा आहेर स्वीकारला,” अशी मिश्कील प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये ऐकायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT