

गणेश गोडसे, बार्शी
ऐन जवानीत मोहाचे क्षण भरपूर येतात; पण या मोहाच्या जाळ्यात अडकायचे की नाही, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण, एकदा का या जाळ्यात अडकला की परतीच्या वाटा बंद होतात...
बीड जिल्ह्याच्या एका खेडेगावातील अश्विनी ही एक गरीब घराण्यातील तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली युवती! घरी अठराविश्व दारिद्य्र... त्यामुळे पोटापाण्यासाठी तिचे आई-वडील मिळेल ती मोलमजुरी करायचे! घरच्या परिस्थितीला आपणही थोडा हातभार लावावा म्हणून तिने पुणे गाठले, बर्यापैकी शिक्षण झालेले असल्यामुळे आणि तिच्या नशिबाने तिला चक्क एका आयटी कंपनीत शिपाई म्हणून नोकरी लागली, तीस-चाळीस हजार रुपये पगारही मिळायला लागला. त्यामुळे आपला खर्च भागवून अश्विनी आता चार पैसे पालकांनाही पाठवून देत होती. घरच्यांनाही लेकीचं कौतुक वाटत होतं, सगळं कसं छान चाललं होतं; पण कदाचित नियतीला हे मंजूर नसावे.
बीड जिल्ह्यातीलच अभिषेक हा ऊसतोडणी मजूर म्हणून काम करणारा एक युवक होता. ऊसतोडणीचा हंगाम संपल्याने तो पोटापाण्याचा अन्य काहीतरी उद्योग शोधण्यासाठी म्हणून पुण्यात आला होता. कर्मधर्मसंयोगानं त्यालाही त्याच कंपनीत झाडलोट करण्याचं काम मिळालं; कारण त्याचं शिक्षण असं काही झालंच नव्हतं. त्यामुळं त्याचं काम हे रोजंदारी स्वरूपाचं होतं, दिवसाकाठी तीन-चारशे रुपये मिळायचे, त्यात त्याचं एकट्याचं कसंबसं भागत होतं. एकाच भागातील असल्याने अश्विनी आणि अभिषेक यांची ओळख झाली, अभिषेक यानेही जवानीचा उंबरठा केव्हाच ओलांडला होता. साहजिकच, दोघांमध्ये प्रेमाचा म्हणा की शारीरिक आकर्षणाचा अंकुर फुटायला वेळ लागला नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. अश्विनीला किमान काहीतरी भवितव्य होतं; पण अभिषेकचं काय... तो तर पडला वेठबिगारी माणूस! उद्या कंपनीनं बाहेरचा रस्ता दाखविला की, ‘भाग चलो’ असा सगळा मामला; पण या सगळ्याचा विचार करायला बिचार्या अश्विनीला वेळ कुठं होता, ती तर त्याच्या प्रेमात जणूकाही वेडीच झाली होती.
अखेर व्हायचं तेच झालं... कंपनीने एकेदिवशी अभिषेकला डच्चू दिला आणि तो रस्त्यावर आला. अश्विनीची रोजीरोटी मात्र सुरक्षित होती. दरम्यानच्या काळात साखर कारखाने सुरू झाले आणि अभिषेकने ऊसतोड मजुरीसाठी गावाकडे जायचा निर्णय घेतला. अश्विनीलाही त्याने सोबत येण्याचा आग्रह धरला. तिनेही मागचा पुढचा विचार न करता अभिषेकसोबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा रस्ता धरला. बार्शीला पोहोचताच अभिषेकने आपल्या आईसोबत आपला जुना ऊसतोडीचा व्यवसाय सुरू केला. या भागातील एका कारखान्यावर ते काम करू लागले. काही दिवसांतच अभिषेकने अश्विनीलाही ऊसतोडीच्या कामाला जुंपले; पण तिला यातले काही जमत नव्हते. आयटी कंपनीच्या वातानुकूलीत कार्यालयात काम करण्याची सवय लागलेल्या अश्विनीला उसाच्या फडातील ती धग आणि वरून आग ओकणारा सूर्य यांचा सामना करणे अशक्य होऊन बसले. दरम्यानच्या काळात अश्विनीचा शोध घेणार्या तिच्या पालकांनाही तिचा शोध लागला. आपल्या मुलीची ही अवस्था बघून बिचार्या आई-वडिलांना गहिवरून आले. त्यांनी अश्विनीला झाले गेले विसरून आपल्या घरी परतण्याचा आग्रह केला; पण इतके सगळे होऊनही अश्विनी काही घरी परतायला तयार झाली नाही. त्यामुळे निरूपाय होऊन तिचे पालक माघारी फिरले.
आयटी कंपनीत काम करीत असताना नेहमी हॉटेलमध्ये जेवायची सवय असल्यामुळे अश्विनीला स्वयंपाक असा काही येतच नव्हता. तशातच ऊसतोडणीचे कामही तिला जमत नव्हते. या कारणावरून अभिषेकची आई सोजर हिने अश्विनीचा नुसता छळवाद मांडला. स्वयंपाक येत नाही, ऊसतोडीचे काम येत नाही म्हणून फडातील उसाने तिला मारहाण करणे, उपाशी ठेवणे, असे प्रकार सुरू झाले; पण अभिषेकवर आणि त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती हा सगळा छळवाद सहन करीत होती. अभिषेकनेही तिचा छळवाद मांडल्यानंतर मात्र मनातून ती पार कोसळून गेली. ज्याच्यासाठी घरदार सोडलं, आई-वडील सोडले, चांगली नोकरी सोडली, ज्याच्यासाठी एसीतून बाहेर पडून उन्हातान्हात राबले तोच अभिषेक आपल्याला मारहाण करतो, हा धक्का तिला सहनच झाला नाही आणि एकेदिवशी तिने पालाच्या झोपडीतील बांबूला गळफास लावून एकदाचे आपले शापित जीवन संपवून टाकले.
अश्विनीने आत्महत्या करताच अभिषेक आणि त्याची आई भानावर आले; पण या गोष्टीची कुठे वाच्यता न करता दोघांनी मिळून रात्रीच्या अंधारात अश्विनीचा मृतदेह बैलगाडीत टाकून एका आडरानात नेला. त्या ठिकाणी हातानेच थोडीफार माती उकरून त्यांनी त्या खड्ड्यात अश्विनीचा मृतदेह टाकून तो पुरून टाकला; पण हा मृतदेह वरच्यावर पुरला असल्यामुळे एक-दोन दिवसांत कुत्र्यांनी उकरून काढला आणि त्याचे लचके तोडायला सुरुवात केली.
हळूहळू बार्शीच्या शिवारात कुत्री कुठल्यातरी बेवारस मृतदेहाचे लचके तोडत असल्याची बाब पोलिसांपर्यंत गेली आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कुत्र्यांनी मृतदेहाची अवस्था ओळखण्यापलीकडे करून टाकली होती, त्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान होते. दरम्यान, अश्विनीच्या आई-वडिलांच्या कानावरही ही वार्ता गेली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही दिवसांपूर्वी अश्विनीच्या वडिलांनी तिला नवीन पैंजण घेऊन दिले होते, ओळखीची ती एक खूण वगळता ओळखण्यासारखे काही नव्हते; पण पैंजणाच्या त्या एका खुणेवरून अश्विनीच्या आई-वडीलांनी आपल्या मुलीला ओळखले आणि एकच हंबरडा फोडला. त्यांचा हंबरडा आणि अश्विनीच्या दुर्दैवाचे दशावतार ऐकून उपस्थितांच्याही काळजाची कालवाकालव झाल्याशिवाय राहिली नाही. याप्रकरणी अभिषेक आणि त्याच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे... दोघेही सध्या कारागृहाचे गज मोजत बसले आहेत; पण मोहाच्या त्या एका क्षणी जर अश्विनी सावरली असती तर तिच्या वाट्याला या मरणयातना नक्कीच आल्या नसत्या.