माळेगाव : समाजात अनेकजण यशस्वी होतात, संपत्ती कमावतात, मोठी घरे बांधतात; परंतु फार थोडे लोक आपल्या यशाचे ऋण समाजाला परत करण्याचा विचार करतात. केज तालुक्यातील सुकळी गावच्या मातीतून घडलेले बांधकाम व्यावसायिक बिभीषणराव गायकवाड यांनी मात्र आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करत शिक्षण क्षेत्रात अशी उभी राहणारी देणगी दिली आहे, जी पुढील अनेक पिढ्यांचे भविष्य उजळणार आहे.
पुण्यात व्यवसायात यश मिळविल्यानंतरही गावाशी नाळ जपणाऱ्या बिभीषणराव गायकवाड यांनी तब्बल ७० लाख रुपये स्वखर्चातून खर्च करून सुकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पाच सुसज्ज आरसीसी वर्गखोल्यांची आधुनिक इमारत उभारली आहे. बुधवारी (दि. १७ जून) या नव्या शाळा इमारतीचे लोकार्पण बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
एकेकाळी सुकळी येथील शाळेची अवस्था अत्यंत दयनीय होती. गळकी छप्परे, मोडकळीस आलेल्या भिंती आणि अपुऱ्या सुविधा यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येत होते. गावातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, या भावनेतून बिभीषणराव गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
आज या शाळेत केवळ वर्गखोल्याच नाहीत, तर रंगीत व बोलक्या भिंती, संगणक, प्रोजेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, प्रशस्त हॉल, खेळणी साहित्य, वृक्षारोपण, आकर्षक प्रवेशद्वार आणि पेव्हर ब्लॉकसह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या तोडीचे वातावरण मिळणार आहे.लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी शिक्षण अधिकारी मुळे, गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी आबासाहेब घायाळ, जनकल्याण को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष उमेशराव कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रेय चाटे, केंद्रीय मुख्याध्यापक लक्ष्मणराव लाखे, बाबासाहेब सारुख यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लवकरच सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक विनायक आवाड यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रत्येक गावातून एखादा उद्योगपती, व्यावसायिक, अधिकारी किंवा यशस्वी व्यक्ती आपल्या जन्मभूमीसाठी अशाच पद्धतीने पुढे आली, तर विकासासाठी केवळ सरकारी तिजोरीकडे पाहण्याची गरज उरणार नाही. समाजाला बदलायचे असेल, तर संपत्तीपेक्षा दानत मोठी असते, याचा वस्तुपाठ सुकळी गावाने आज राज्यासमोर ठेवला आहे.
प्रत्यक्षात राष्ट्रनिर्मितीची गुंतवणूक : जितीन रहमान
"बिभीषण गायकवाड यांनी स्वखर्चातून उभारलेल्या या शाळेच्या रूपाने शिक्षण क्षेत्राला अमूल्य योगदान दिले आहे. शासनाच्या योजना महत्त्वाच्या आहेतच, पण समाजातील सक्षम व्यक्तींनी अशा प्रकारे पुढे येत शाळांना हातभार लावला तर ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहराच बदलू शकतो. शिक्षणात केलेली गुंतवणूक ही प्रत्यक्षात राष्ट्रनिर्मितीची गुंतवणूक असते."
आईचे स्वप्न पूर्ण झाले, यापेक्षा मोठा आनंद नाही
"या शाळेची अवस्था पाहून मनाला वेदना होत होत्या. गावातील गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांनाही चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, ही भावना होती. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि आईचेही हेच स्वप्न होते. आज ही शाळा उभी राहिल्याने आईचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद मिळाला. पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण तो समाजासाठी खर्च झाला तरच त्याला खरे मूल्य प्राप्त होते."