Parli Municipal Council
परळी वैजनाथ : बहुचर्चित परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणुकीत एकमेव राज्यस्तरावरील संपूर्ण महायुतीचा प्रयोग बघायला मिळाला होता. महायुतीतील राज्य स्तरावरील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई व मित्र पक्ष हे सर्व घटक पक्ष परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत एकत्र होते. सुरुवातीपासूनच महायुतीने एकसंघपणे ही निवडणूक पार पाडली आणि महायुती म्हणून ऐतिहासिक विजयही प्राप्त केला. मात्र, गटनेता निवड प्रक्रियेत महायुतीतील दोन प्रमुख पक्षांनी आपापले दोन स्वतंत्र गट स्थापन केले असुन स्वतंत्र गटनेतेही नेमले आहेत. त्यामुळे परळी नगर परिषदेच्या राजकारणात हा एक नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.
परळीत नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. तर 35 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस - 16 ,शिवसेना शिंदे गट - 2, भाजपा - 7,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 2, काँग्रेस - 1, एम आय एम -1, अपक्ष -6 असे संख्याबळ आहे. परळी नगरपरिषदेतील विविध पक्ष व गटांच्या गटनेत्याची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये महायुतीतील दोन प्रमुख पक्षांनी आपापले स्वतंत्र गट स्थापन केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाचा एक गट झाला आहे.
तर भाजपने दोन अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत आपला स्वतंत्र गट स्थापित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. तर भाजप गटनेतेपदी प्रा.पवनकुमार मुंडे यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान परळी नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक झाली. या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, रिपाई व मित्र पक्षाने महायुती म्हणून ही निवडणूक एकत्रितपणे लढली. या महायुतीला प्रचंड प्रतिसाद देत परळी नगर परिषदेमध्ये ऐतिहासिक विजय महायुतीला मिळाला.
निवडणूक निकालानंतर आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडी आणि विविध समित्यांचे सभापती निवडण्याच्या प्रक्रिया सुरू होतील. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध पक्ष आघाड्यांच्या गटांची स्थापना व गट नेत्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली आहे.
यामध्ये महायुतीतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले स्वतंत्र गट स्थापित करून गटनेते निवडले आहेत. नगरपरिषद सभागृहातील कामकाज व विविध समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीमध्ये या गटांच्या स्थापनेचे महत्त्व आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वतंत्र गट हे सभागृहात आपापली भूमिका मांडू शकणार आहेत.