beed news  
बीड

Myanmar trapped Beed youth |'मुलाला सुखरूप मायदेशी आणा', म्यानमारमध्ये अडकलेल्या मुलांच्या सुटकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

'मुलाला सुखरूप मायदेशी आणा'; प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

बीड : म्यानमारमधील कुख्यात गोल्डन ट्रॅगल परिसरात नोकरीच्या आमिषाने ओलिस ठेवण्यात आल्याचा दावा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तरुण स्वप्निल काळुंखे यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मुलाला सुखरूप भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

स्वप्निल काळुंखे याने काही दिवसांपूर्वी मित्राशी दूरध्वनीवर संपर्क साधत म्यानमारमधील गोल्डन ट्रॅगल परिसरात आपल्यासह अनेक भारतीय तरुणांना बळजबरीने ठेवण्यात आले असून, त्यांच्याकडून दररोज १९ ते २२ तास बेकायदेशीर ऑनलाइन काम करून घेतले जात असल्याचा दावा केला होता. या प्रकरणी बीड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल म्यानमारला जाऊन आता महिनाभराचा कालावधी झाला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून त्याचे कुटुंब जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. यापूर्वीही कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधल्याचे सांगत आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली होती. सोमवारी झालेल्या भेटीतही प्रशासनाने प्रयत्न सुरू असल्याचा पुनरुच्चार करत कुटुंबीयांना धीर दिला.

"माझे पती स्वप्निल यांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करावेत. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या संपर्कात आहोत. प्रत्येक दिवस आमच्यासाठी चिंतेचा आहे. सरकारने या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घालून त्यांची लवकर सुटका करावी, हीच आमची अपेक्षा आहे."
स्वप्निल काळुंखे यांच्या पत्नी

या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांमार्फत आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या स्तरावर आवश्यक पाठपुरावा सुरू आहे. कुटुंबीयांनी धीर ठेवावा. स्वप्निल यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी प्रशासनाकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT