बीड

बीड: मनकर्णिका तलावाने तळ गाठला; पिंपळनेरसह १५ गावांना पाणी टंचाईचे चटके

अविनाश सुतार


पिंपळनेर: ‌बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील लिंबारुई देवी येथील मनकर्णिका तलावाने मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे पिंपळनेरसह दहा ते पंधरा गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या दुष्काळाच्या झळा लवकरच जाणवू लागल्या आहेत. विहीर, बोरवेल, हातपंप कोरडीठाक पडले असून महिलांना रानोमाळ पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या तलावात केवळ १५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मनकर्णिका प्रकल्पाचे कर्मचारी नंदकिशोर खामकर यांनी दिली.

बीड तालुक्यातील लिंबारूई देवी येथील मनकर्णिका तलावातील पाणी पिण्यासह सिंचनासाठी वापरले जाते. येथून मोठ्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. मागील महिन्यापूर्वीच पाणीटंचाई भासू नये, म्हणून पाटबंधारे विभागामार्फत पाणी आरक्षित करण्यात आले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पुरेशा पाण्याअभावी ऊस, फळबाग यासह भाजीपाला वाळू लागला आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून फळबाग लागवड केली. पण पाण्याअभावी बागा करपू लागल्या आहेत.

पुढील ४ महिन्यांत पिंपळनेरसह परिसरातील जवळपास ४० गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. गावोगावी, वाडी, वस्ती, तांड्यावरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईग्रस्त गावांना प्रशासनाने तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप घुमरे यांनी दिला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT