Beed Water Crisis pudhari photo
बीड

Beed Water Crisis : पाणी कुठं मुरतय, याचा शोध घेणार

बीडच्या पाणीपुरवठा प्रश्नावर आ.पंडित आग्रही

पुढारी वृत्तसेवा

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी बीडचा पाणीप्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता, सर्व यंत्रणांना कामाला लावत बीड नगर पालिकेच्या थकीत विज बिलासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. पवारांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आ.विजयसिंह पंडित कामाला लागले असून माजलगाव प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने उपसा होणारे पाणी नेमकं मुरतंय कुठं, याचा शोध घेवून बीडकरांना किमान चार दिवसाला पाणी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आ.पंडित यांनी दिली.

शुक्रवार रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजलगाव बॅक वॉटर काडीवडगाव आणि ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. या पाहणीत योजनेच्या पाईपलाईनवर पाणी गळती, पाणी वितरणातील अवमेळ, फिल्डवरील बिघाड याकडे झालेले दुर्लक्ष आणि तांत्रिक चुका अशा धक्कादायक बाबी यावेळी समोर आल्या. या सर्वांचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

माजलगावच्या काडीवडगाव येथील बॅकवॉटरवरून 36 एमएलटी पाणी प्रत्यक्षात उचलण्यात येत असले तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीमुळे ईटच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. ही अशीच गळती जलशुध्दीकरण केंद्रावरही होत असल्याचे निदर्शनास आल्याने याचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसताच आ. विजयसिंह पंडित यांनी भविष्यातील उन्हाळी परिस्थिती, रजमान व इतर सण लक्षात घेता तातडीने उपलब्ध साधन सामग्रीचा व यंत्रणेचा वापर करून बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्या बाबतच्या सूचना पालिका प्रशासन, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिल्या आहेत.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता तुषार टेकावडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, सभापती शेख निजाम, शेख मुजीब, अभियंता माने, विद्युत विभागाचे विजय गाडेकर, उदय ईपिल्ला, एम.जी. पठाण, दत्ता व्यवहारे, एम.बी.सानप, रशिद सय्यद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरात बदल होतोय

बीड नगर परिषदमध्ये स्व.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बीड शहरातील जनतेने परिवर्तन केले. नगर परिषदेची सत्ता हाती आल्यानंतर आ. विजयसिंह पंडित हे आपल्या नगरसेवकांसह शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रश्न निकाली निघत आहेत. स्वच्छतेसाठी घंटागाड्या, पाणी पुरवठा यांसह विविध मुलभूत प्रश्न मार्गी लागत असल्याने बीड शहरामध्ये बदल होत असल्याची चर्चा नागरीकांमधून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT