Gramsabha action against Ahire family
केज : गावातील अनेकांवर खोट्या पोलिस केसेस करून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कुटुंबा विरुद्ध केज तालुक्यातील एका ग्रामसभेत ठराव घेतला असून त्याचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा ग्राम पंचायतीचे सरपंच सुरज पटाईत यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३ मे रोजी ग्रामसभा संपन्न झाली. त्या ग्रामसभेत अध्यक्ष तथा सरपंच सुरज पटाईत हे स्वतः सूचक असून त्यांनी ठराव क्रमांक ८ द्वारे असा ठराव मांडला की, विडा येथील अहिरे कुटुंबातील नऊ सदस्य हे अनेकांवर खोट्या केसेस करून गावात दहशत निर्माण करीत आहेत.
त्या कुटुंबातील अनेकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. तसेच त्या कुटुंबातील महिला गावातील प्रतिष्ठित व्यक्तींवर विनयभंगा सारखे गंभीर व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात. आता पर्यंत त्यांनी अनेकांवर अशा सुमारे दहा केसेस केलेल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबाचा बंदोबस्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असा ठराव मांडला. त्याला सदाशिव वाघमारे यांनी अनुमोदन दिले.
या ठरावावर चर्चा करून हा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकरणी गृहमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी यांनी त्याच्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी केली आहे.
या ठरावाच्या अनुषंगाने सरपंच सुरज पटाईत आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या दोघांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र पोलिस निरीक्षक यांना दिले असून त्यात म्हटले आहे की, संतोष भिमराव अहिरे, भिमराव गंगाराम अहिरे, गोविंद घढवे, रिमपाली अमर हजारे, अर्चना दादाराव वाघमारे, सुमाबाई भिमराव अहिरे, दिपाली अरुण वाघमारे, वंदना गोविंद घढवे आणि भाग्यश्री भिमराव अहिरे लोकांनी गावामध्ये अनेकदा दहशत निर्माण करुन त्रास देण्याचे काम करत आहे. तरी या लोकांवर केज पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कार्यावाही न झाल्यास गावामध्ये अनुसुचित प्रकार घडू शकतो. असा उल्लेख केलेला आहे.
याच्या प्रती पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, विभागीय पोलिस उपअधिक्षक आणि तहसीलदार यांना दिल्या आहेत. या पत्रावर सरपंच सुरज पटाईत, ग्रामविकास अधिकारी अरुण पोटभरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.