Vadvani Elderly Couple Attack
वडवणी : मुलगा मुलीच्या मागे लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून दोघांवर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना वडवणी शहरातील पांढरेवस्ती येथे बुधवारी (दि. 30) रात्री दहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात धर्मराज गुरसाळी यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली, तर त्यांची पत्नी शोभा गुरसाळी (वय 75) यांच्या हातालाही जखम झाली. याप्रकरणी विठ्ठल वरवडे (रा. राम मंदिर चौक, वडवणी) याच्याविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा गुरसाळी या पती धर्मराज यांच्यासोबत पांढरेवस्ती येथे राहतात. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास विठ्ठल वरवडे त्यांच्या घरी आला. त्याने घराची आतून कडी लावली. त्यानंतर, ‘तुझ्या मुलाला माझ्या मुलीच्या नादी लागू नको, असे सांगितले होते. तरीही तो तिच्या मागे आहे. मला माझी मुलगी तुम्हाला द्यायची नाही,’ असे म्हणत दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर वरवडे याने हातातील धारदार हत्याराने धर्मराज गुरसाळी यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी पुन्हा वार करण्याच्या तयारीत असताना शोभा गुरसाळी यांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावरही वार केला. मात्र, शोभा यांनी आरोपीला ढकलल्याने वार त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला लागला.
या घटनेनंतर शोभा गुरसाळी यांनी गुरुवारी (दि. 1) वडवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विठ्ठल वरवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी तपास सुरू केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्याम गायकवाड तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.