Beed Umakiran sexual abuse case
बीड : उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या विजय पवार यांची बीड शहरातील ‘ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल’ ही शाळा चक्क बिंदुसरा नदीच्या पूर रेषेत, म्हणजेच रेड झोनमध्ये बांधण्यात आली आहे. नगर परिषद आणि शिक्षण विभागाने परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे शेकडो मुलांचा जीव धोक्यात आला असून प्रशासकीय यंत्रणा शांत आहे. राजकीय वरदहस्त असल्याने यावर आजपर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे.
विजय पवार यांच्यावर उमाकिरण बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच गुन्हा दाखल आहे. त्यानंतर 2023 मध्ये एका विद्यार्थ्यावर बॅटने मारहाण केल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. मात्र या तक्रारीची दखलही घेण्यात आली नाही. उमाकिरण प्रकरण उघड झाल्यावरच ती फाईल बाहेर आली आणि दुसरा गुन्हाही नोंदवण्यात आला.
शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या काठावर रेड झोनमध्ये ही शाळा उभी राहिली. 1991 सारखा पूर आला तर विद्यार्थ्यांच्या जिवाची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल पालकवर्ग करत आहे. जर नगर परिषदेने परवानगी दिली असेल तर रेड झोनमध्ये ती कशी दिली गेली?, आणि जर परवानगी दिली नसेल, तर शाळा आजपर्यंत तिथे चालते कशी? असा सवाल पालकांनी केला आहे.
शाळेचे बांधकाम पूर रेषेत का?
नगर परिषद आणि शिक्षण विभागाने ही इमारत थांबवली नाही का?
बाल अत्याचाराच्या आरोपीच्या शाळेला संरक्षण का?
शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं हे गुन्हा नाही का?
शासन, महिला आयोग, बाल संरक्षण विभाग यांची भूमिका काय?
ही शाळा त्वरित बंद करून, पूररेषा बाहेर हलवावी. नगर परिषद आणि शिक्षण विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी. शाळेच्या संचिकेची चौकशी लावून संपूर्ण परवानगी प्रक्रियेचा तपास व्हावा.
बाल अत्याचाराचा आरोपी विजय पवार यांची शाळा रेड झोनमध्ये
नगर परिषद व शिक्षण विभाग यांची भूमिका संशयास्पद
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर दुर्लक्ष
पूर्वीच्या तक्रारी झाकल्या गेल्या; उमाकिरण प्रकरणानंतरच उघड
शाळेची संपूर्ण चौकशी होऊन ती त्वरित बंद करण्याची नागरिकांची आग्रही मागणी