Beed News : ऊठसूट बंदूक परवाना मागणाऱ्यांना बसला चाप ! file photo
बीड

Beed News : ऊठसूट बंदूक परवाना मागणाऱ्यांना बसला चाप !

बीड : वर्षभरात अवघे सात जणांचे अर्ज, तेही झाले नामंजूर

पुढारी वृत्तसेवा

Beed: Those who ask for a gun license are slapped

उदय नागरगोजे

बीड : गत वर्ष-दीड वर्षाच्या काळात बीडमधील बंदूक परवानाधारक आणि त्यांनी तयार केलेल्या सोशल मीडियावरील रील चर्चेत आल्या होत्या. यानंतर मात्र प्रशासनाने अशा प्रकारांवर लक्ष ठेवत कारवाई सुरू केली, तसेच परवाना दिलेल्यांना देखील त्याची खरोखर गरज उरली आहे का, हे तपासले. यानंतरच्या काळात मात्र बंदूक परवाना मागणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली असून वर्षभरात अवघे सात अर्ज परवाना मिळण्यासाठी आले होते, तेही नामंजूर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या काळात मोठी चर्चा झाली. यावर उपाययोजनांबाबत प्रशासनकीय अधिकाऱ्यांना निर्देशदेखील देण्यात आले होते. याच काळात बीड जिल्ह्यात बंदूक परवानाधारकांचा मुद्दादेखील चर्चेत आला होता. यातील अनेकांनी केवळ हौस म्हणून आणि माझ्याकडे बंदूक आहे हे मिरवण्यासाठीच आपल्या राजकीय 'वजनाचा' वापर करत परवाने मिळवले होते.

या हौशी मंडळींनी या बंदुकीसोबतच्या रिल्सदेखील समाजमाध्यमातून व्हायरल केल्या होत्या. या सर्व प्रकाराची राज्यभरात चर्चा झाल्यानंतर मात्र या सर्व परवान्यांची तपासणी करण्यात आली असता तब्बल चारशे परवाने रद्द करण्यात आले होते. सध्या बीड जिल्ह्यात 885 जणांकडे पिस्तूल परवाना असून नव्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या मात्र अतिशय कमी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 363 अर्ज आले होते, ते देखील नामंजूर करण्यात आले असून आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असे अर्जच येत नसल्याचे समोर आले आहे.

पिस्तूल कमरेला लावून मिरवण्याची हौस !

जिल्ह्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मंडळींकडून आपल्याला पिस्तूल परवाना गरजेचा असल्याचे भासवत अर्ज केला जात होता. यातील अनेकांना पिस्तूल परवाना देण्यात येत होते. यानंतर ही मंडळी अगदी सार्वजनिक ठिकाणी देखील आपल्याकडे पिस्तूल असल्याचे प्रदर्शन केले जायचे. अगदी सार्वजनिक ठिकाणी कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्यांच्या रिल्स देखील व्हायरल झाल्या होत्या.

परवाना मिळवून देतो म्हणणारेही गायब

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चीला गेल्यानंतर प्रशासनाकडून देखील पिस्तूल परवाना देण्याबाबतच्या निकषांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाऊ लागली. यामुळेच पिस्तूल परवान्यासाठी गेल्या तीन वर्षांत आलेल्या अर्जापैकी तब्बल 363 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज नामंजूर होत असल्याने आता पिस्तूल मागणारेच कमी झाले आहेत. तसेच तुम्हाल पिस्तूल परवाना मिळवून देतो म्हणत अधिकारी आणि संबंधित व्यक्तिमत्त्व मध्यस्थी करणाऱ्यांचा 'धंदा' देखील बंद झालाय !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT