Ashti jewellery theft
कडा : श्रीगोंदा येथे लग्न समारंभासाठी गेलेल्या आष्टीतील महिलेचे साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने एसटी बस प्रवासात चोरीला गेले. आष्टी परिसरातील शिदेवाडी येथील सुलोचना रखमाजी केरुळकर ही महिला त्यांच्या मावस बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथे दि.२३ मे रोजी गेली होती. शनिवार, दि.२४ मे रोजी विवाह समारंभ झाल्यानंतर याच गावातील त्यांच्या माहेरी भाऊ संतोष सूर्यभान बोरुडे यांच्या घरी त्या गेल्या. तेथे त्यांची मुलगीही पुण्याहून आली होती. यावेळी मुलीने तिचे दागिने आईकडे दिले.
एक दिवस भावाच्या घरी राहिल्यानंतर केरूळकर या रविवार,दि. २५रोजी घोगरगाव येथून अहिल्यानगरला जाण्यासाठी मंगळवेढा-अहिल्यानगर बसमध्ये बसल्या .भावाचा मुलगा त्यांना सोडण्यासाठी आला होता.यावेळी त्यांनी मुलीचे व स्वतःचे असे सुमारे १५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकत्र करुन बॅगमधील एका कप्प्यात ठेवले होते.
घोगरगाव येथून अहिल्यानगर येथील चांदणी चौकात आल्यानंतर त्यांनी बॅग तपासून पाहिली दागिने नसल्याचे लक्षात आले. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर ८ लाख ४५ हजार २०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.
एक तोळा २ ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस, चार तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, चार तोळे १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा टेम्पलचा गंठण (किंमत ४ लाख ५ हजार), दोन तोळे २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा शाही हार (किंमत १ लाख ९४ हजार), एक तोळा २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चकोर आदी सोन्याचे एकूण ८ लाख ४५ हजार २०० रुपये किमतीचे दागिने चोरट्याने बस प्रवासात लांबविले.