Re-NEET 2026 result pudhari photo
बीड

Re-NEET 2026 result : बीडच्‍या सोहम गवतेच्या तक्रारीची 'एनटीए'कडून दखल

सोळा तास प्रतीक्षा करण्याच्या सूचना; री नीटमध्ये गुणांचा गोंधळ

पुढारी वृत्तसेवा

बीड : री नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने गुणांकन केल्याचा आरोप केला जात आहे. बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याला ओएमआर शीट आणि प्रत्यक्ष मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आढळून आल्याने त्याने याबाबत एनटीएकडे तक्रार नोंदवली आहे. त्याच्या या तक्रारीची एनटीएने दखल घेतली असून सोळा तासांनंतर माहिती दिली जाईल असा संदेश गवते कुटुंबाला मिळाला आहे. त्यानंतर मात्र त्यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

बीड येथील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्याने री नीट परीक्षा दिली होती. ही परीक्षा दिल्यानंतर आलेली अ‍ॅन्सर की आणि ओएमआर शीट याची टॅली सोहम गवते याने केली होती. त्यानुसार त्याला 522 गुण मिळत होते. एवढे गुण मिळणार असल्याने सोहम व त्याचे कुटुंबीय आनंदात होते. परंतु री नीटचा निकाल जाहीर झाला तेव्हा गवते कुटुंबाला अक्षरशः धक्का बसला. यामध्ये त्याला केवळ 95 गुण मिळाले होते. यानंतर जवळपास चार ते पाच तास सोहम कोणालाही बोलत नव्हता.

अखेर काही नातेवाईकांनी समजूत घालत आपण या प्रकरणात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, पण न्याय मिळवू अशी त्याची समजूत घातली. या सर्व प्रकरणात सोहम व त्याच्या कुटुंबीयांनी एनटीएला मेल केले होते, त्याला आता रिप्लाय देण्यात आला आहे. सोहमचा नीटचा परीक्षा नंबर हायलाईटवर ठेवण्यात आला आहे. सोळा तासांत त्याने नोंदवलेल्या तक्रारीवर निर्णय दिला जाणार असल्याचा संदेश देखील पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता तोपर्यंत थांबण्याचा निर्णय गवते कुटुंबाने घेतला आहे.

या निर्णयातून समाधान झाले नाही तर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी देखील गवते यांनी केली आहे. यासाठी ते काही विधिज्ञांचा सल्लादेखील घेणार आहेत. रविवारी पहाटे तीन वाजता एनटीएने दिलेली मुदत संपणार असून त्यानंतरच पुढील भूमिका ठरवणार असल्याचे सोहमचे वडील नितीन गवते यांनी सांगितले.

ज्ञानेश्‍वरी पवारनेही घेतला आक्षेप!

सोहम गवते याच्याप्रमाणेच वडवणी येथील ज्ञानेश्‍वरी पवार हीने देखील मिळालेल्या गुणांबाबत आक्षेप नोंदवला आहे. तीने केलेल्या तयारीनुसार आणि सोडवलेल्या प्रश्‍नांनुसार 702 गुण मिळत होते, परंतु प्रत्यक्षात तिला अवघे 87 गुण मिळाले आहेत. या गुणांमुळे पवार कुटुंबाला देखील धक्का बसला आहे.

ज्ञानेश्‍वरी पवार हीने तिला मिळालेले गुण तसेच ओएमआर शिटदेखील चुकीचे असल्याची तक्रार एनटीएकडे नोंदवली आहे. परंतु आठ वेळेस तिचा मेल रिझेक्ट करण्यात आल्याचे तिने सांगितले. आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी पवार कुटुंबाने केली आहे. ज्ञानेश्‍वरीने केलेल्या अभ्यासाच्या जोरावर तिचा एम्सला नंबर लागेल अशी कुटुंबीयांना अपेक्षा होती, परंतु आता समोर आलेल्या गुणांमुळे मोठा धक्का त्यांना बसला आहे.

सणवार साजरा केला नाही; १८ तास अभ्यास!

नीटची तयारी करताना सोहम गवते असेल किंवा ज्ञानेश्‍वरी पवार असेल यांनी सणवार साजरा केला नाही, वेळ व्यर्थ खर्च होईल अशा कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत. अगदी घरी आलेल्या नातेवाईकांची भेट टाळली, कुटुंबासोबत देखील वेळ घालवला नाही, केवळ अभ्यास आणि अभ्यास हेच धोरण ठेवले. दिवसाचे सोळा ते अठरा तास अभ्यास केला, परंतु मिळालेल्या गुणांमुळे मोठा धक्का या दोन्ही कुटुंबांना बसला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT