आरोपी श्रीनिवास लखमावाड pudhari photo
बीड

Beed Bribery Case : ४५ लाखांची लाच घेताना वन विभागाच्या अधिकाऱ्याला पकडले

उपमुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आटोपताच घेतली लाच

पुढारी वृत्तसेवा

बीड : येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले ही कारवाई शुक्रवारी (दि.३१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास या अधिकाऱ्याच्याच नगर रोडवरील निवासस्थानी संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

विशेष म्हणजे हा अधिकारी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होता. तेथून कार्यालयात आणि त्यानंतर घरी जाताच ही कारवाई करण्यात आली. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बीड व नांदेड येथील निवासस्थानांची झडती देखील घेतली जात आहे. श्रीनिवास लखमावाड असे लाच घेणाऱ्या विभागीय वन अधिकाऱ्याचे नाव आहे.

लखमावाड हे गेल्या काही वर्षांपासून बीडमध्ये कार्यरत आहेत. वृक्ष लागवड निधी वितरित करण्यासाठी बारा टक्के प्रमाणे व निलंबन प्रस्ताव पाठपुरावा न करण्यासाठी, प्रलंबित दोन वेतनवाढ देण्यासाठी व नर्सरी कामाची चौकशी न करण्यासाठी सहकार्य करण्याकरिता तब्बल ४५ लाख रुपयांची मागणी लखमावाड याने तक्रारदाराकडे केली होती.

२९ जुलै रोजी ही मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, त्याची खात्री केल्यानंतर शुक्रवारी सापळा लावण्यात आला होता. परंतु पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असल्याने लखमावाड हा सकाळपासून व्यस्त होता.

ही बैठक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संपल्यानंतर लखमावाड हा सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात गेला. त्या ठिकाणी थोडा वेळ थांबल्यानंतर त्याच्या नगर रोड भागातील ऊर्जा हाईटस् येथील निवासस्थानी पोहचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने लखमावाड याला फोन केल्यानंतर ४५ लाख रुपयांची रक्कम घेऊन तक्रारदार व पंच त्याच्या निवासस्थानी पोहचले. त्या ठिकाणी लखमावाड याने ही रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर लखमावाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.

वृक्ष लागवड कागदावरच !

गतवर्षी झालेल्या वृक्ष लागवडीवरून गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. त्याच वृक्षलागवड, नर्सरी कामाची चौकशी न करणे यासाठी जर ४५ लाख रुपये अधिकारी घेत असतील तर वृक्ष लागवड तरी कशा पद्धतीने केली जात असेल ? नर्सरीमधील कारभार कशापद्धतीने चालत असेल? हे देखील या निमित्ताने समोर आले आहे. आता ही वृक्ष लागवड खरोखरच झाली होती, का? नर्सरीमध्ये नेमके काय गैरप्रकार होते ? याची देखील तपासणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्याची मागणी पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT