बीड : स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या निवडणुकीत समोरासमोर उभे असलेले उमेदवार अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे.
विरोधी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी मोठा दावा करत सांगितले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना ही निवडणूक मुळात लढवायचीच नव्हती. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे त्यांना रिंगणात उतरावे लागले. या विधानामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय वादळ उठले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात आधीच तणावाचे वातावरण असताना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. खरे कोण आणि खोटे कोण? याबाबत गावात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, सहानुभूतीचा मुद्दा,विकासाचा मुद्दा आणि आता दबावाच्या आरोपांचा मुद्दा या तिन्ही गोष्टींमुळे निवडणूक अधिकच रंगतदार आणि निर्णायक बनली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेली ही निवडणूक केवळ सरपंच पदासाठी नसून प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यातून मतदार कोणावर विश्वास ठेवतात, हे निकालात स्पष्ट होणार आहे.
न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार ः स्वरूपानंद देशमुख
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढा देणार आहे. तसेच त्यांनी पाहिलेली गाव विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा पुढे करत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणाचाही दबाव नाही : अश्विनी देशमुख
माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मी स्वतःच्या इच्छेने निवडणूक लढवत आहे, असे त्यांनी स्पष्ट करून उमेदवारीमागे धनंजय देशमुख यांनी दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले .